तरुणांमध्ये रजिस्टर मॅरेजचा ‘टे्रंड’
By Admin | Published: May 12, 2015 04:16 AM2015-05-12T04:16:45+5:302015-05-12T04:16:45+5:30
लग्न एकदाच होते, त्याची आठवण सगळ्यांनी काढली पाहिजे, मग धुमधडाक्यात लग्न का करू नये’ अशी एकप्रकारची मानसिकता पूर्वी तरूणांमध्ये
नम्रता फडणीस / हिनाकौसर खान-पिंजार , पुणे
‘लग्न एकदाच होते, त्याची आठवण सगळ्यांनी काढली पाहिजे, मग धुमधडाक्यात लग्न का करू नये’ अशी एकप्रकारची मानसिकता पूर्वी तरूणांमध्ये पहायला मिळत होती. यासाठी लग्नावर वारेमाप पैशाची उधळण करण्याबद्दल देखील त्यांच्या मनात ’किंतु’ असत नव्हता. आता मात्र जग बदलते आहे! एकविसाव्या युगाकडे वाटचाल करताना तरूणाईच्या विचारसरणीत कमालीचे बदल होत आहेत. विवाहपद्धतीवर विश्वास नसण्यापासून ते सध्याच्या महागाईच्या काळात लग्नाचा थाट-माट, पाहुणे मंडळींचा राबता, त्यांचे मान-पान, जेवळावळीपर्यंतचा खर्च टाळण्यासाठी झगमगत्या विवाहसोहळ्याला बगल देत नोंदणीपद्धतीने (रजिस्टर)लग्न करण्याचा ’ट्रेंड’ हळूहळू समाजात प्रस्थापित होऊ लागला आहे. मागील चार महिन्यांची आकडेवारी पाहता यापद्धतीने दिवसाला सरासरी १२-१५ ते लग्न होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पण चित्र निश्चितचं आशादायी नाही आहे का!
‘लग्न’हा मुख्यत्वे नवरा अन नवरी च्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण. प्रत्येक युवापिढीने आपल्या लग्नाचे सुंदर स्वप्न पाहिलेले असते. मात्र आपल्याच स्वप्नाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहाण्याचा नवा विचार त्यांच्यामध्ये रूजत चालला आहे. लग्न, लग्नाचा पेहराव, खानपान, मानपान, नजीकच्या आप्तेष्टांसाठी विविध गिफ्टस घेणे यावर वारेमाप खर्च होतो. शिवाय पूर्वीप्रमाणे आता लग्न समारंभ हा नवरीच्या घरी किंवा अंगणात होत नाहीत.
लग्नासाठी मोठमोठे हॉल्स किंवा लॉन्सच घेणे भाग पडते. यातच ‘‘लग्न’ वधूकडच्या मंडळींनी करून देण्याची प्रथा चालत आली आहे, वडिलाधाऱ्यांचा आयुष्यभराचा पैसा खर्ची जातो तर काही वेळा कर्ज ही काढावे लागतात. त्यामुळे उच्च शिक्षित मुलींना हीच प्रथाच मान्य नाही. या सर्व गोष्टी टाळण्यासाठीच नोंदणीपद्धतीने लग्न करून वायफळ खर्चाला आळा घालण्याकडे तरूणांचा कल वाढत चालला असल्याचे दिसत आहे.