केवळ नोंदणी.. मात्र, अपॉईनमेंट स्लॉटच उपलब्ध नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:08 AM2021-04-29T04:08:09+5:302021-04-29T04:08:09+5:30
लसीकरण प्रक्रियेतील गोंधळ संपेना : १८ ते ४४ वयोगटांसाठी स्लॉटच उपलब्ध नाही लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बुधवारी (२८ ...
लसीकरण प्रक्रियेतील गोंधळ संपेना : १८ ते ४४ वयोगटांसाठी स्लॉटच उपलब्ध नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बुधवारी (२८ एप्रिल) दुपारी ४ वाजल्यापासून कोविन ॲपवर १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण नोंदणीला सुरुवात झाली. मात्र, १८ ते ४४ या वयोगटांतील नागरिकांसाठी वेगळा स्लॉटच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नुसतीच नोंदणी झाल्याने अनेकांची निराशा झाली. याशिवाय, वेबसाईट काही वेळेसाठी क्रॅश होणे, वन टाइम पासवर्ड उपलब्ध न होणे अशा अनेक समस्यांचा या वेळी सामना करावा लागला.
सर्व राज्यांनी १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्याप्रमाणे या वयोगटातील नागरिकांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, लसींचा तुटवडा असल्याने १ मेपासून लसीकरण सुरू करणे शक्य नसल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे कोविन ॲपवरही वेगळा स्लॉट अद्याप उपलब्ध नसल्याचे दिसून आले.
देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. तेव्हा भारत संपूर्ण जगाला लसी पुरवेल, असा आशावाद व्यक्त केला जात होता. मात्र, लसीकरण सुरुवातीपासूनच अडथळ्यांची शर्यत ठरली आहे. नोंदणीत अडचणी, लसीकरण केंद्रांवर गर्दी, लसींचा तुटवडा अशा अनेक समस्या उभ्या ठाकत आहेत. १ मेपासूनच्या लसीकरणातही अडथळे येत आहेत, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
-----
मी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी कोविन ॲपवर नोंदणी केली. तेव्हा लगेच ओटीपी प्राप्त होऊन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, अपॉईंटमेंट प्रक्रिया उपलब्ध नव्हती. स्लॉट केवळ ४५ वर्षे वयोगटाच्या व्यक्तींसाठीच उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. ४.१५ च्या दरम्यान माझ्या मित्राने नोंदणीचा प्रयत्न केल्यावर वेबसाईट क्रॅश झाल्याचे लक्षात आले.
- ओंकार केळकर
-----
मी ४ ते ५ असा एक तास नोंदणीसाठी प्रयत्न करत होते. मात्र, ओटीपी न आल्याने पुढील प्रक्रिया पूर्ण झाली नाही. एकाच वेळी सर्व ठिकाणांहून लोक नोंदणीसाठी प्रयत्न करत असल्याने वेबसाईटच्या सर्व्हरवर ताण आलेला असू शकतो.
- श्रुती फडके