कामगार पुतळा झोपडपट्टीधारकांची नोंदणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:11 AM2021-06-09T04:11:50+5:302021-06-09T04:11:50+5:30
पुणे : मेट्रो स्थानकाच्या कामात शिवाजीनगर न्यायालयासमोरील कामगार पुतळा वसाहत आणि राजीव गांधी वसाहती बाधित झाल्या आहेत. येथील नागरिकांचे ...
पुणे : मेट्रो स्थानकाच्या कामात शिवाजीनगर न्यायालयासमोरील कामगार पुतळा वसाहत आणि राजीव गांधी वसाहती बाधित झाल्या आहेत. येथील नागरिकांचे हडपसर आणि विमाननगरमधील एसआरए प्रकल्पामध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. या वसाहतींमधील पात्र ठरलेल्या ९५८ झोपडीधारकांपैकी ७२५ झोपडीधारकांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन सदनिका नोंदणी करून घेतली आहे. तर, २३३ झोपडीधारक अनुपस्थित राहिले. त्यांना आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
पुनर्वसन करण्यात आलेल्या झोपडपट्टीधारकांच्या नवीन सदनिकांच्या दुय्यम निबंधक कार्यालयाकडील नोंदणीचे करण्यात आले. या दोन्ही झोपडपट्ट्यांमध्ये मिळून जवळपास १ हजार ५०० झोपडीधारक आहेत. या नागरिकांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया २४ मेपासून सुरू झाली. ही प्रक्रिया ८ जूनपर्यंत सुरू राहणार होती. या मुदतीत सदनिका न स्वीकारणाऱ्यांचा हक्क संपुष्टात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते.
तरीदेखील २३३ झोपडीधारक या नोंदणी प्रक्रियेला अनुपस्थित राहिले. या सर्वांची नोंदणी करण्यासाठी आणखी तीन दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. पुढील तीन दिवस दुय्यम नोंदणी कार्यालये दुपारी तीनपर्यंत सुरू ठेवली जाणार आहेत.
====
या झोपडपट्ट्यांमध्ये ५० दुकानदार होते. या दुकानदारांनी सदनिकांचा स्वीकार केल्यानंतर त्यांच्या दुकानांविषयी विचार करू, असे सांगण्यात आले.
====
कामगार पुतळा आणि राजीव गांधी वसाहतीमधील नागरिकांना पात्र करण्यासाठी २०१६ पर्यंतच्या झोपड्या ग्राह्य धरण्यात आल्या आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून शासन निर्णयानुसार २००० सालापर्यंतच्या झोपड्या ग्राह्य धरल्या जातात. मात्र, मेट्रो योजना २०१६ ला जाहीर झाल्याने २३ डिसेंबर २०१६ पर्यंतच्या झोपड्या पात्र केल्या आहेत. अपात्र असलेल्या ५५० झोपडीधारकांपैकी अनेकांकडे कागदपत्रे आणि पुरावे नाहीत. काही जणांनी अपिल केले असून, त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.
- राजेंद्र निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
====
एकूण घरे - १५०८
पात्र - ९५८
अपात्र - ५५०