सहव्याधी असलेल्यांनी करावी नियमित आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:11 AM2021-04-07T04:11:04+5:302021-04-07T04:11:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “कोरोना विषाणू, तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा सर्वाधिक धोका सहव्याधी असलेल्या रुग्णांना असतो. त्यांची रोग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “कोरोना विषाणू, तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा सर्वाधिक धोका सहव्याधी असलेल्या रुग्णांना असतो. त्यांची रोग प्रतिकारकशक्ती कमी झालेली असल्याने कोणताही आजार पटकन बळावतो. त्यामुळेच को-मॉर्बिड (सहव्याधी असलेल्या) व्यक्तींनी दर तीन महिन्यांनी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी,” असे आवाहन ‘जागतिक आरोग्य दिना’च्या निमित्ताने डॉक्टरांनी केले आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैली स्वीकारणे गरजेचे आहे.
शारीरिक आणि मानसिक अशा प्रकारच्या अनेक को-मॉर्बिडिटीज असलेले लोक ॲलर्जी आणि संसर्गाशी लढण्यास सर्वसामान्यांइतके सक्षम नसतात. निरोगी लोकांच्या तुलनेत या व्यक्ती अनेक आजारांनी वेढलेले असतात. मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयाची समस्या, मूत्रपिंडाचा रोग आणि तीव्र अडथळा आणणारा फुफ्फुसीय रोग (सीओपीडी) यासारखे आजार असलेल्या वृद्ध व्यक्तींमध्ये संसर्गाचा धोका जास्त असतो. वेळीच काळजी न घेतल्यास इतर आरोग्याच्या समस्या जसे मूत्रपिंड किंवा फुफ्फुसातील बिघाड किंवा यकृत खराब होण्याची शक्यता देखील उद्भवू शकते.
आनंदी राहण्यासाठी, जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतःची चांगली काळजी घेणे आवश्यक आहे. को-मॉर्बिड व्यक्तीमधील रोग प्रतिकारकक्षमता आधीच कमी असते. त्यामुळे रूग्णांनी नियमित आरोग्य तपासणी करणे, मानसिक तणावापासून दूर राहणे आणि हृदयाची काळजी घेणे आवश्यक आहे असे जनरल फिजिशियन डॉ. मुकेश बुधवानी यांनी सांगितले. “नियमितपणे आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. संसर्गाच्या काळात प्रकृती बिघडली तर त्वरित उपचार घेण्यास उशीर लावू नका,” असे डॉ. प्रेरणा अग्रवाल यांनी सांगितले.
चौकट
-कोमॉर्बिड व्यक्तींनी रक्तातील साखरेची तपासणी, वजन, यूरिक अँसिडची पातळी, हिमोग्राम, मूत्रपिंड, लिव्हर फंक्शन टेस्ट, लिपिड प्रोफाइल, फॅटी लिव्हरसाठी सोनोग्राफी, लठ्ठपणाबाबत तपासणी आणि आपल्या रक्तदाबाच्या पातळीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
-मानसिक आजारांचा सामना करणाऱ्या व्यक्तींनी समुपदेशकांचा आधार घ्यावा.
-नियमित आरोग्य तपासणीशिवाय कोमर्बिडीटी असणाऱ्या व्यक्तींनी संतुलित आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे. आहारात सर्व आवश्यक पोषक घटकांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. ताजी फळे, भाज्या, शेंगा, डाळी, संपूर्ण धान्य आणि सोयाबीनचा आहारात समावेश करा.
-धूम्रपान, मद्यपान, प्रक्रिया केलेले, तेलकट, मसालेदार आणि जंक फूडचे सेवन टाळा.
-नियमित व्यायाम करा, तणाव कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान करा, रात्रीची झोप टाळू नका, औषधे घेणे टाळू नका.