Pune Metro: रविवारपासून नियमित मेट्रो धावणार; पुणेकर 'या' तिकीट दरात सुखद प्रवास अनुभवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 01:54 PM2022-03-03T13:54:31+5:302022-03-03T13:55:23+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि. ६) मेट्रोचे उद्घाटन करतील

Regular pune Metro to run from Sunday Pune citizens will experience a pleasant journey at this ticket price | Pune Metro: रविवारपासून नियमित मेट्रो धावणार; पुणेकर 'या' तिकीट दरात सुखद प्रवास अनुभवणार

Pune Metro: रविवारपासून नियमित मेट्रो धावणार; पुणेकर 'या' तिकीट दरात सुखद प्रवास अनुभवणार

googlenewsNext

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि. ६) मेट्रोचे उद्घाटन करतील. उद्घाटन झाल्यानंतर त्याच दिवसापासून लगेच पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी व वनाज ते गरवारे हे दोन्ही मार्ग व्यावसायिक तत्त्वावर सुरू होणार आहेत. या मार्गाचे कमीत कमी तिकीट १० रुपये व जास्तीत जास्त तिकीट २० रुपये असेल. परतीचे तिकीट हवे असेल तर त्यासाठी ३० रुपये शुल्क द्यावे लागेल. दोन्ही ठिकाणी हाच तिकीट दर असणार आहे.

सकाळी ७ वाजता मेट्रो सुरू होईल. रात्री ९ वाजता थांबेल. प्रत्येक मार्गावर एकूण २७ फेऱ्या होतील. ज्यांचे १०० तासांचे मेट्रो ड्रायव्हिंग पूर्ण झाले आहे, असे प्रशिक्षित चालक दोन्ही मेट्रोला असणार आहेत. त्यांना ८ तासांची ड्युटी आहे. ताशी ८० किलोमीटर या वेगाने प्रवाशांना नेण्याची महामेट्रोला रेल्वे सुरक्षा व दक्षता आयुक्तांची परवानगी मिळाली आहे. प्रत्येक स्थानकात मेट्रो २० व गर्दी असेल तर ३० सेकंद थांबणार आहे. मेट्रोच्या सर्व डब्यांचे दरवाजे आपोआप बंद व खुले होणारे आहेत. दरवाजा बंद झाल्याशिवाय मेट्रो सुरूच होणार नाही.

सुरुवातीच्या काही दिवसांसाठी महामेट्रो प्रत्येक स्थानकात प्रवाशांसाठी एक हेल्पिंग पॉईंट असेल. याशिवाय प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी स्थानकात व डब्यातही एक कर्मचारी असणार आहे. तिकीट कुठे काढायचे, दोन मजली स्थानकात केव्हा, कुठे, कसे जायचे याबाबत हा कर्मचारी प्रवाशांना मार्गदर्शन करेल.

सर्व स्थानकांची कामे पूर्ण 

या दोन्ही मार्गांवरील सर्व स्थानकांची तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असणारी सर्व कामे पूर्ण झाली आहेत. स्थानकाला तांत्रिकदृष्ट्या चढण्या-उतरण्यासाठी दोन्ही बाजूंना किमान तीन प्रकारच्या सुविधा असणे गरजेचे आहे. त्यातील साधा जिना व सरकता जिना सर्व स्थानकावर कार्यान्वित झाला आहे. लिफ्टचे काम काही ठिकाणी झाले असून, काही ठिकाणी सुरू आहे. ते लगेचच पूर्ण करण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न होत आहे.

स्थानकाची माहिती... 

पहिल्या मजल्यावर तिकीटघर असेल. तिकीट काढल्यानंतरच दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या जिन्यावर किंवा लिफ्टमध्ये प्रवेश मिळेल. तिकीट नसेल तर तिथे जाताच येणार नाही. याच मजल्यावर खाद्यपदार्थ, तसेच अन्य वस्तूंचे विक्री स्टॉल्स असतील. प्रसाधनगृहही याच मजल्यावर आहे. स्थानकाच्या दुसऱ्या मजल्यावर मेट्रोचा फलाट (प्लॅटफॉर्म) आहे. सध्या तीनच डब्यांची मेट्रो आहे, फलाट मात्र सहा डब्यांच्या अंतराचा केला आहे. पहिल्या मजल्यावरून स्थानकाच्या दोन्ही बाजूंना जाता-येता येणे शक्य आहे. दुसऱ्या मजल्यावर मात्र त्यासाठी मनाई आहे. स्थानकातील प्रवेशासाठी सध्या तरी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. मात्र, काही दिवसांनंतर ते आकारले जाण्याची शक्यता आहे.

स्थानकापर्यंत येण्याजाण्यासाठी सोय

स्थानकापर्यंत येण्याजाण्यासाठी महामेट्रो फस्ट ॲण्ड लास्ट कनेक्टिव्हिटी अंतर्गत रिक्षा, टॅक्सी, सायकल यांची व्यवस्था करणार आहे. त्याची प्राथमिक तयारी झालेली असून, लवकरच ही व्यवस्थाही कार्यान्वित होईल.

Web Title: Regular pune Metro to run from Sunday Pune citizens will experience a pleasant journey at this ticket price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.