ससूनमध्ये नियमित शस्त्रक्रिया सुरू होणार; सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 12:31 PM2020-10-20T12:31:21+5:302020-10-20T12:33:12+5:30
लॉकडाऊन लागू झाल्यापासून ससून रुग्णालयामधील सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत...
पुणे : लॉकडाऊन काळात ससून रुग्णालयात बंद करण्यात आलेल्या नियमित शस्त्रक्रिया टप्प्याटप्याने सुरू केल्या जाणार आहेत. कोरोना रुग्णांचा ताण कमी होत असल्याने रुग्णालय प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
लॉकडाऊन लागू झाल्यापासून ससून रुग्णालयामधील सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण आपत्कालीन व आवश्यक शस्त्रक्रिया या काळात सुरू होत्या. हे प्रमाण तुलनेने खुप कमी होते. कोविड केंद्रामध्ये एप्रिल महिन्यापासून रुग्ण संख्या वाढू लागल्यानंतर मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे नॉन कोविड रुग्णांच्या उपचारांवरही परिणाम झाला. पण मागील काही दिवसांपासून रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सुरू केल्यानंतर रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. तसेच आता कोरोनाबाधित रुग्णांचा ताणही कमी झाला आहे. त्यामुळे मनुष्यबळ उपलब्ध होत आहे.
लॉकडाऊनपूर्वी रुग्णालयात दररोज सुमारे ५० जोखमीच्या तर सुमारे १२५ अन्य शस्त्रक्रिया होत होत्या. सध्या हे प्रमाण अनुक्रमे केवळ १५ व २० एवढेच आहे. लॉकडाऊन काळात प्रामुख्याने सिझेरीयन, हृदयविकार आदी शस्त्रक्रिया होत्या. अनलॉकमध्ये आता अपघात होऊ लागल्याने जखमी रुग्णांच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढत आहे. आता अन्य शस्त्रक्रिया सुरू करण्याच्या सुचनाही विभागांना दिल्या आहेत. या शस्त्रक्रिया फार दिवस पुढे ढकलता येणार नाहीत. पण त्यामध्ये एकदम वाढ केली जाणार नाही. टप्याटप्याने या शस्त्रक्रिया सुरू होतील. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी असले तरी अचानक वाढ झाल्यास त्यावर परिणाम व्हायला नको, म्हणून ही दक्षता घेतली जाणार आहे.
-----------
लॉकडाऊनमध्ये बहुतेक सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. केवळ आपत्कालीन शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने रुग्णालयावरील ताणही कमी झाला आहे. मनुष्यबळही उपलब्ध होत आहे त्यामुळे आता लॉकडाऊन काळात थांबविण्यात आलेल्या शस्त्रक्रिया टप्य्याटप्याने सुरू करणार आहेत.
- एस. चोकलिंगम, विशेष कार्य अधिकारी, ससुन रुग्णालय व जमाबंदी आयुक्त
--------------
ससून रुग्णालयातील शस्त्रक्रियांची स्थिती
लॉकडाऊन पुर्वी
जोखमीच्या - ५०
अन्य - १२७
सद्यस्थितीत
जोखमीच्या - १५
अन्य - २०
----------------