‘ती’ बांधकामे नियमित करा
By admin | Published: June 27, 2015 03:48 AM2015-06-27T03:48:44+5:302015-06-27T03:48:44+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात
खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यामध्ये भेट घेऊन शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लावण्याची पुन्हा विनंती केली. अनधिकृत बांधकाम प्रश्नाबाबत येत्या अधिवेशनात ठोस निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे बारणे यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामप्रश्नी बारणे खासदार होण्याअगोदरपासून लढा देत आहेत. बारणे म्हणाले, ‘‘भाजपा-शिवसेना सरकार येऊन सहा महिन्यांचा कालावधी झाला आहे. परंतु, हा प्रश्न जैसे थे असून, महापालिका व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून नागरिकांना घरे पाडण्याबाबतच्या नोटिसा दिल्या जातात. अनेक घरांवर कारवाईदेखील झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. हा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी सरकारच्या वतीने तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. तसेच, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने १९८४पूर्वी संपादित केलेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना १२.५ टक्के परतावा दिला नाही. तोही मिळावा, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. चर्चेनंतर मुख्यमंत्री म्हणाले, येत्या अधिवेशनात या प्रश्नाबाबत निर्णय घेऊन उच्च न्यायालयाला सरकारच्या वतीने कळविले जाईल. तसेच, मी स्वत:देखील या प्रश्नाबाबत गांभीर्याने लक्ष घातले.’’(प्रतिनिधी)