कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीत करा; अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:09 AM2021-04-03T04:09:24+5:302021-04-03T04:09:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पाणीपुरवठा विभागाने आशानगर येथे २० लाख लिटरची पाणी बांधली आहे. परंतु, त्या टाकीला मुख्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पाणीपुरवठा विभागाने आशानगर येथे २० लाख लिटरची पाणी बांधली आहे. परंतु, त्या टाकीला मुख्य पाईपलाईनमधून रस्तेखोदाईचे अडचण असल्याचे सांगून पाणी पोहचविले जात नाही. महापालिकेचे हे उत्तर न पटणारे आहे. शिवाजीनगर मतदारसंघातील डेक्कन, चतु:श्रृंगी मंदिर परिसर, पांडवनगर, औंध भागात लवकरात लवकर कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष अॅड. नीलेश निकम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे़
याबाबत अॅड. निकम व राजू साने यांनी आयुक्तांची भेट घेऊन या भागातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत अॅड. निकम यांनी सांगितले की, गोखलेनगर, जनवाडी, निलज्योती, आशानगर, वैदुवाडी, श्रमिक नगर, शिवाजी हौसिंग सोसायटी, बहिरट नगर, चतुश्रृंगी मंदिर परिसर हा भाग उंचावर वसल्याने या भागास कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. यामुळे येथील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा याकरिता आशानगरमध्ये २० लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली़
मात्र या टाकीला एस. एन. डी. टी येणाऱ्या मुख्य जलवाहिनीतून सेनापती रस्त्यावर रस्ता खोदाईची अडचण असल्याचे अजब कारण महापालिकेकडूनच सांगण्यात येत आहे. रस्ते खोदाईला इतरांना परवानगी देणाऱ्या महापालिकेला येथे रस्ता खोदण्यास कोणती अडचण आहे, असा प्रश्न उपस्थित करून अॅड. निकम यांनी साडेचार वर्षांपासून बंद ठेवलेले काम लवकर सुरू करावे. अन्यथा महापालिकेसमोर आंदोलन करण्याशिवाय आमच्या समोर पर्याय नसल्याचे सांगितले आहे.