खेडसह शिरूर तालुक्यात ड्रोनच्या आधारे रेकी? नागरिक धास्तावले, अंधाऱ्या रात्री ‘ड्रोन’ची दहशत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 06:29 PM2024-06-26T18:29:52+5:302024-06-26T18:30:01+5:30

अंधाऱ्या रात्रीत ड्रोन फिरवून त्या माध्यमातून हायटेक चोरी करण्याचा प्रयत्न चोरांकडून केला जात असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे....

Reiki based on drones in Shirur taluka with villages? Citizens are scared, the terror of 'drones' in the dark night | खेडसह शिरूर तालुक्यात ड्रोनच्या आधारे रेकी? नागरिक धास्तावले, अंधाऱ्या रात्री ‘ड्रोन’ची दहशत

खेडसह शिरूर तालुक्यात ड्रोनच्या आधारे रेकी? नागरिक धास्तावले, अंधाऱ्या रात्री ‘ड्रोन’ची दहशत

शेलपिंपळगाव (पुणे) :खेडसह शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात रात्रीच्यावेळी ‘ड्रोन’ची दहशत पसरली आहे. एकाच परिसरात तीन ते चार ड्रोन फिरताना दिसत आहेत. अंधाऱ्या रात्रीत ड्रोन फिरवून त्या माध्यमातून हायटेक चोरी करण्याचा प्रयत्न चोरांकडून केला जात असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्थानिक जनता पुरतीच दहशतीखाली आली आहे.

चार ते पाच महिन्यांपूर्वी खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये मध्यरात्री ड्रोन फिरत होते. त्यानंतर आठ दिवसांपूर्वी दौंड तालुक्यात ड्रोन वावरण्याच्या घटना उघड झाल्या आहेत. मात्र, आता शिरूर तालुक्याचा पश्चिम भाग ड्रोनने व्यापला आहे. यापूर्वी साबळेवाडी, बहुळ, कोयाळी - भानोबाची, सिद्धेगव्हाण, चिंचोशी, मोहितेवाडी, वडगाव - घेनंद, शेलपिंपळगाव, शेलगाव आदी गावांमध्ये दिवसा पाळत ठेवून रात्रीच्या वेळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वी बहुळ परिसरात एका रात्रीत चार ते पाच ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. वाढत्या चोरीच्या प्रकारांमुळे परिसरात भीतीसदृश वातावरण पसरले आहे.

सद्य:स्थितीत बहुळ, साबळेवाडी, मांजरेवाडी, चौफुला, करंदी, पऱ्हाडवाडी, केंदूर परिसरात रात्री दहानंतर आकाशात चार ते पाच ड्रोन लुकलुकताना दिसत आहेत. मात्र, हा ड्रोन रात्रीच्या वेळी परिसरात का घिरट्या घालतोय? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. ड्रोनच्या माध्यमातून रेकी करून चोरीचा फंडा वापरला जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. सध्या दररोज रात्री सोशल मीडियावर ड्रोनचा व्हिडीओ व्हायरल होत असून सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले जात आहे. तर बहुतांश गावातील तरुणांनी सोशल मीडियावर ब्रॉडकास्ट ग्रुप बनवून त्या माध्यमातून सर्वांना अलर्ट केले जात आहे.

चोरीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीच्या वेळी परिसरात गस्त घालण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत ड्रोनच्या साह्याने चोरीच्या घटना घडलेल्या अद्यापपर्यंत आढळून आले नाही. मात्र हे ड्रोन का फिरतात याचा पोलिस शोध घेत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून केले जात आहे.

Web Title: Reiki based on drones in Shirur taluka with villages? Citizens are scared, the terror of 'drones' in the dark night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.