राज्यपालांना विमान परवानगी नाकारणं हा राज्य सरकारच्या मनाचा कद्रुपणा : चंद्रकांत पाटलांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 02:20 PM2021-02-11T14:20:07+5:302021-02-11T14:28:28+5:30
राज्य सरकारकडून सुडाचे, द्वेषाचे राजकारण सुरु आहे. मात्र, सामान्य जनता ही गोष्ट पाहत आहे.
पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नियोजित दौऱ्यानुसार आज उत्तराखंडसाठी रवाना होणार होते. पण सरकारी विमानात बसल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप त्यांच्या विमान प्रवासाला परवानगी देण्यात आलेली नसल्याचं कळालं. त्यामुळे त्यांना विमानातून खाली उतरावं लागलं आणि पुन्हा राजभवनात परतावं लागल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर विरोधी पक्षांकडून राज्य सरकारच्या या निर्णयाविरुद्ध टीकेची झोड उठविण्यात येत आहे. आता याच धर्तीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांना हवाई प्रवासाला परवानगी नाकारत विमानातून खाली उतरविणे हा राज्य सरकारच्या मनाचा कद्रूपणा आहे अशा शब्दात ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
पुण्यात चंद्रकांत पाटील एका बैठकीला उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, आधी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केली. आता राज्यपालांना विभागले जात आहेत. हे छोट्या मनाचे लक्षण आहे. साधारण राज्यपालांच्या कुठल्याही प्रवासाची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठ्वावी लागते. तसेच ही फाईल मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ मार्गी लावली जाते. पण राज्यपालांची ही फाईल क्लिअर केली गेली नाही. त्यामुळे त्यांना शासकीय विमातून उतरावे लागले. आणि व्यावसायिक विमानाने हा प्रवास करावा लागला. हे सर्व सुडाचे द्वेषाचे राजकारण सुरु आहे. सामान्य जनता ही गोष्ट पाहत आहे.
सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांचे ट्विट देश अहिताचे आहे का?
सचिन तेंडुलकर व लता मंगेशकर यांनी केलेले ट्विट हे देश हिताचे होते की अहिताचे ? त्यांनी अन्य देशातल्या लोकांनी आमच्या देशांगांतर्गत प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज नाही यासंबंधी हे ट्विट केले. ते चुकीचे आहे का? त्याची चौकशी करणार आहे का? मुळात ते देश हिताचे बोलले पण त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही असा सवाल पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांनी एवढा एवढा अहंकार बाळगणे योग्य नाही : देवेंद्र फडणवीस
राज्यातील ठाकरे सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानानं प्रवास करायला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आहे. मात्र याच मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. त्याच दरम्यान माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना संताप व्यक्त केला आहे. आजपर्यंतच्या इतिहासात एवढे अहंकारी इगोइस्टिक सरकार कधी पहिले नाही असा हल्लाबोल केला आहे.