किन्नर म्हणून आधी नाकारले अन् तळमळ पाहून संधी दिली! तृतीयपंथी वारकऱ्यांचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 11:07 AM2024-07-01T11:07:12+5:302024-07-01T11:07:40+5:30
मागील दोन वर्षांपासून देहू ते पंढरपूर अशी वारी मी करत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीतील संत रोहिदास महाराज पालखी क्रमांक १३ मध्ये आम्ही तृतीयपंथी सहभागी होत आहोत...
पुणे : पंढरीची वारी करण्याचा लहानपणापासून निश्चय केला होता; परंतु तृतीयपंथी असल्याने अनेकांनी नाकारले. दोन वर्षांपूर्वी एका पालखीत सहभागी होण्यासाठी गेलो असता, त्याठिकाणी आम्हाला नकार देण्यात आला. त्यावेळी थोडं दुःख वाटलं. त्यानंतर पंढरपूरचे गवळी महाराज यांनी आम्हाला दिंडीत सहभागी होण्यासाठी सहकार्य केले आणि देवाची आस असेल तर तुमची इच्छा नक्की पूर्ण होते, याचा प्रत्यय मला त्यादिवशी आला, अशा भावनिक शब्दात डॉ. दीपामम्मी नांदगिरी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
मागील दोन वर्षांपासून देहू ते पंढरपूर अशी वारी मी करत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीतील संत रोहिदास महाराज पालखी क्रमांक १३ मध्ये आम्ही तृतीयपंथी सहभागी होत आहोत. २५० वारकऱ्यांच्या या दिंडीत ७ ते ८ तृतीयपंथी आहेत. वारीमध्ये प्रत्येकाला जी वागणूक दिली जाते तशीच वागणूक आम्हालाही दिली जात आहे. सगळे आपुलकीने आणि आदराने आम्हाला सन्मान देत असल्याने आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत, अशी भावना यातून मागील दोन वर्षांत कधीच जाणवली नाही. विठ्ठलाची आस असल्याने आम्हाला परमेश्वर बोलावत असल्याचा भास होत असतो.