भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांचे परवाने रद्द
By admin | Published: October 21, 2015 01:12 AM2015-10-21T01:12:25+5:302015-10-21T01:12:25+5:30
रिक्षाचालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातही ऐन सणासुदीत या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, याबाबतच्या तक्रारींचे प्रमाणही दिवसें
पुणे : रिक्षाचालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातही ऐन सणासुदीत या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, याबाबतच्या तक्रारींचे प्रमाणही दिवसें दिवस वाढत आहे. त्यामुळे भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला असून त्यानुसार, गेल्या दोन दिवसांत तब्बल ६०० रिक्षाचालकांचे वाहन परवाने सहा महिन्यांच्या कालावधीसाठी रद्द करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविण्यात आले आहेत.
त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष पथके स्थापन करण्यात आली असून, ती रेल्वेस्थानके आणि बस स्थानकांच्या परिसरात तैनात करण्यात आली आहेत. रिक्षाचालकाने भाडे नाकारताच, या पथकाकडून तत्काळ कारवाई केली जात आहे.
शहरात सणांमुळे खरेदीसाठी बाहेर गावांवरून येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. मात्र, प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी रिक्षाचालकांकडून भाडे नाकरण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याबाबतच्या तक्रारींचा पाऊस गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांकडे करण्यात येत आहे. मोटार वाहन अधिनियमानुसार, अशा प्रकारे भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकास केवळ ५० रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे.
हा दंड नाममात्र असल्याने हे प्रकार मोठ्या संख्येने वाढले आहेत. त्याला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली असून, दंडाचा फरक पडत नसल्याने भाडे नाकारणाऱ्या संबधित रिक्षा चालकाचा परवाना काही कालावधीसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सोमवारी (दि.१९) आणि मंगळवारी सुमारे ६२० परवाने जप्त करण्यात आले असून ते निलंबनासाठी आरटीओ कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.
ठिकाण निश्चिती केली
ही मोहीम सुरू करण्यापूर्वी शनिवारी साध्या वेशातील पोलिसांनी भाडे नाकारल्या जाणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली होती. त्यानुसार, अशी ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, त्या ठिकाणी कारवाईसाठी पथक तैनात करण्यात आले आहे.
- सारंग आवाड,
उपायुक्त, वाहतूक पोलीस
बेकायदेशीर वाहतूक, परवाना नसने यांच्यावर कारवाई करणे अभिप्रेत आहे. अनेकदा कमी अंतरासाठी भाडे घेतले जात नाही. मात्र, त्यांच्यावर कारवाई करताना, त्यांनाही बाजू मांडण्याची संधी मिळावी. चालकांकडून एवढा मोठा गुन्हा केला जात नाही की, साध्या वेशात त्यांच्यावर कारवाई केली जावी. चालकांनाही अशा प्रकारे भाडे नाकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- नितीन पवार, निमंत्रक, रिक्षा पंचायत