प्रकृती स्वास्थ्यामुळे नाकारले मंत्रिपद : दिलीप वळसे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:40 IST2024-12-16T13:37:24+5:302024-12-16T13:40:01+5:30
आंबेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांनी सलग आठव्यांदा विजय मिळवला आहे.

प्रकृती स्वास्थ्यामुळे नाकारले मंत्रिपद : दिलीप वळसे पाटील
मंचर : प्रकृतीच्या कारणास्तव तसेच मतदारसंघाला अधिकचा वेळ देता यावा, यासाठी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिपद घेतले नसल्याची चर्चा होत आहे.
आंबेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांनी सलग आठव्यांदा विजय मिळवला आहे. वळसे पाटील यांना मंत्रिपदाचा प्रदीर्घ अनुभव आहे. १९९० साली ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. त्यावेळी त्यांना विधिमंडळ अंदाज समितीचे प्रमुख करण्यात आले होते. १९९७-९८ साली विधानसभेतील ‘उत्कृष्ट संसदपटू’ या पुरस्काराने वळसे पाटील यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर १९९९ साली त्यांना सर्वप्रथम मंत्रिपद मिळाले. त्यांच्यावर उच्च व तंत्र शिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली. २००२ साली उच्च व तंत्र शिक्षण खात्याबरोबरच ऊर्जा खात्याची जबाबदारी आली.
२००३ साली ऊर्जा व तंत्र शिक्षण खात्याचे ते मंत्री होते. २००८ साली ते वित्त व नियोजन खात्याचे मंत्री होते. २००९ साली महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी प्रभावी कामकाज केले. या काळात विधानमंडळाचे कामकाज योग्य पद्धतीने चालावे, यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. राज्यात विविध मंत्रिपदे सांभाळत असताना वळसे पाटील यांनी कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. कॅबिनेट मंत्री म्हणून काम करताना त्यांनी दूरदृष्टी ठेवून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
मात्र, यावेळच्या मंत्रिमंडळात वळसे पाटील नाहीत. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी मंत्रिपद नाकारल्याची चर्चा सुरू आहे. मतदारसंघात अधिकचा वेळ देता यावा, हा हेतूसुद्धा आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर कामाच्या व्यापात मतदारसंघात फिरता येत नाही मग काही प्रमाणात रोष निर्माण होतो हे सुद्धा मंत्रिपद न घेण्याचे एक कारण असावे.
दोन दिवसांपूर्वी त्यांनी त्याचा इन्कारही केला होता
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर वळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खंबीर साथ दिली आहे. महायुती सरकारमध्ये त्यांनी सहकार मंत्री म्हणून काम पाहिले. राष्ट्रवादीमधील पहिल्या फळीतील ते नेते आहेत. राष्ट्रवादीमध्ये कुठलाही निर्णय घेताना वळसे पाटील यांच्याशी सल्लामसलत केली जाते. प्रकृतीमुळे वळसे पाटील मंत्रिपद घेणार नाहीत, अशी चर्चा यापूर्वी सुरू होती. दोन दिवसांपूर्वी त्यांनी त्याचा इन्कारही केला होता. मात्र आज झालेली घडामोड पाहता, यावेळी मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय हा खुद्द वळसे पाटील यांचाच असल्याची चर्चा होत आहे. अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच उलगडा होईल.