पत्नीचा छळ करणाऱ्या पतीचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 03:34 AM2018-04-20T03:34:30+5:302018-04-20T03:34:54+5:30
पत्नीचा शारीरिक, मानसिक छळ करणारा पती व त्याच्या नातेवाईकाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांनी हा आदेश दिला.
पुणे : पत्नीचा शारीरिक, मानसिक छळ करणारा पती व त्याच्या नातेवाईकाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांनी हा आदेश दिला.
याबाबत २८ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना डिसेंबर २०१६ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत लोहगाव येथील एका सोसायटीमध्ये घडली. फिर्यादींनी तिच्या पतीविरोधात बलात्काराची तक्रार दिली होती. त्यामुळे बदनामी झाल्याने पतीने तिच्याकडे घटस्फोट देण्याची मागणी केली. मात्र, फिर्यादीने घटस्फोटास नकार दिला. त्यामुळे पतीने फिर्यादीचा शारीरिक, मानसिक छळ केला. त्यांना मारहाण केली. त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले.
तर पतीचा ३५ वर्षीय नातेवाईकाने फिर्यादी एकट्या असल्याचा फायदा घेत त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचे विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पती, त्याच्या नातेवाईकाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी विरोध केला.
या गुन्ह्यात पती, त्याच्या नातेवाईकाची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे. यासाठी दोघांना अटक करणे गरजेचे आहे. दोघे मूळचे झारखंड येथील रहिवासी आहेत. अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यास दोघे फरार होण्याची शक्यता आहे, यासाठी दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळावा, असा युक्तिवाद अॅड. सप्रे यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.