मावळत्या महापौरांचा लंडन दौऱ्याला नकार
By admin | Published: February 25, 2016 04:10 AM2016-02-25T04:10:28+5:302016-02-25T04:10:28+5:30
लंंडनचा दौरा हा तेथील काही सरकारी विभागांनी फार पूर्वीच आयोजित केलेला आहे. त्यांच्या काही अधिकाऱ्यांसमवेत बैठकांचेही नियोजन झालेले आहे. त्यामुळे आता ऐन वेळी दौरा रद्द
पुणे : लंंडनचा दौरा हा तेथील काही सरकारी विभागांनी फार पूर्वीच आयोजित केलेला आहे. त्यांच्या काही अधिकाऱ्यांसमवेत बैठकांचेही नियोजन झालेले आहे. त्यामुळे आता ऐन वेळी दौरा रद्द करणे अयोग्य असल्याचे सांगून आयुक्त कुणाल कुमार यांनी आपण लंडन दौऱ्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. मावळते महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मात्र आपण त्या वेळी महापौरपदावर नसल्यामुळे या दौऱ्यात सहभागी होणार नसल्याचे सांगितले.
स्मार्ट सिटीसंदर्भातील आयुक्त कुणाल कुमार यांच्या या दौऱ्यावरून सध्या पालिकेत चर्चा सुरू आहे. २९ फेब्रुवारीला स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम पालिकेचे सन २०१६-१७चे अंदाजपत्रक सादर करणार आहेत. नेमक्या याच वेळी आयुक्त तर नसतीलच; पण त्यांच्यासमवेत शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त (विशेष) अनिल पवार, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला हे पालिकेचे महत्त्वाचे अधिकारीही लंडनला जाणार असल्याने तेही नसतील. त्यावरून स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांनी स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
पालिकेचे अंदाजपत्रक महत्त्वाचा विषय आहे. पुणेकरांसाठीही तो जिव्हाळ्याचा आहे. अशा वेळी पालिकेचे प्रमुख असलेले आयुक्त व अन्य महत्त्वाचे अधिकारीच लंडनच्या दौऱ्यावर जाणार असतील, तर तो पुणेकरांचा एक प्रकारचा अपमानच आहे. त्यांचा अभ्यास दौरा नंतरही होऊ शकतो, असे कदम यांचे म्हणणे आहे. आयुक्त कुणाल कुमार यांनी यावर काहीही न बोलता हा दौरा पूर्वनियोजित असल्याने आपण जाणार असल्याचे सांगितले. स्मार्ट सिटीमधील प्रकल्प जे राबविणार आहेत, अशा काही अधिकाऱ्यांनाही आणण्याबाबत संबंधित अधिकारी आग्रही असल्यामुळेच वाघमारे, पवार, बोनाला यांचाही दौऱ्यात समावेश केला, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
मावळते महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी या दौऱ्यात आपण सहभागी होणार नसल्याचे सांगितले. दौरा होणार आहे त्या वेळी आपण पदावर नसू; त्यामुळे दौऱ्यात नाव असले तरीही सहभागी होणे अयोग्य असल्याने आपण जाणार नाही, असे ते म्हणाले. बापट यांचेही नाव या लंडन दौऱ्यात आहे. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही; मात्र ते जाणार नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.