रात्री जल्लोष केला अन् सकाळी थरकाप उडाला..., मंडळाच्या सदस्याने कथन केलेला प्रसंग सुन्न करणारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 03:01 PM2023-04-16T15:01:58+5:302023-04-16T15:03:01+5:30

काही तासांपूर्वी जल्लोष केला त्यांना मृतावस्थेत पाहून आम्हालाही अश्रू अनावर झाले

Rejoicing in the night and shivering in the morning the incident narrated by a member of the board is mind-numbing | रात्री जल्लोष केला अन् सकाळी थरकाप उडाला..., मंडळाच्या सदस्याने कथन केलेला प्रसंग सुन्न करणारा

रात्री जल्लोष केला अन् सकाळी थरकाप उडाला..., मंडळाच्या सदस्याने कथन केलेला प्रसंग सुन्न करणारा

googlenewsNext

नारायण बडगुजर

पिंपरी : काही तासांपूर्वी ज्यांच्यासोबत जल्लोष केला, त्यांच्या चहा-पाण्यापासून जेवणाची व्यवस्था केली त्यांच्याच बसला अपघात झाला. त्यात काही जणांचा मृत्यू झाल्याची बातमी सकाळी झोपेत असतानाच कळली अन् थरकाप उडाला. सुन्न झालो. काय करावे काही सूचेना. पण लगेचच मित्रांना संपर्क साधून बर्म्युड्यावर घटनास्थळाकडे धावत सुटलो. पिंपळे गुरव येथील अरविंद कसबे यांनी कथन केलेला हा प्रसंग सुन्न करणारा आहे.  

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील अखिल सुदर्शननगर जयंती महोत्सव मंडळातर्फे मुंबई येथील ढोल-ताशा पथकाला बोलावण्यात आले होते. त्यांच्या चहापाण्यचासह जेवण व इतर व्यवस्थेची जबाबदारी महोत्सव मंडळाचे सदस्य असलेल्या अरविंद कसबे यांच्याकडे होती. मुंबईतून दाखल झाल्यापासून ढोल-ताशा पथकासोबत कसबे होते. सायंकाळपासून सर्व सदस्यांना काय हवे-नको याची विचारपूस कसबे करीत होते. आमच्या पथकामध्ये कोणीही मद्यपान करीत नाही, त्यामुळे आम्ही जोरदार ढोल-ताशा वाजवून जल्लोष करतो, असे पथकातील काही जणांनी कसबे यांना सांगितले. त्यानुसार पथकाने जोरदार प्रदर्शन करून ढोल-ताशाच्या गजराने परिसर दणाणून सोडला. त्यामुळे त्यांच्या व्यवस्थेत कोणतीही कसून राहणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली. मिरवणुकीनंतर पथकाचे जेवण झाले. त्यानंतर कसबे यांनी देखील त्यांना थांबण्याचा आग्रह केला. मात्र, पथक मुंबईकडे निघाले.  

उत्सव जल्लोषात पार पडल्याने महोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कसबे हे देखील आनंदात होते. त्याच आनंदात सर्वजण घरोघरी गेले. मात्र, सकाळी जाग येण्यापूर्वीच मुंबईतील पथकाची बस खोपोली येथे दरीत कोसळल्याची बातमी येऊन धडकली. पिंपळे गुरव येथे ढोल-ताशा वाजवून मुंबईकडे परतणाऱ्या पथकाचा अपघात झाल्याचे कळले. त्यामुळे झोप उडाली अन् डोळे खाडकन उघडले. मन सुन्न झाले, शब्द फुटेनासा झाला. मात्र, स्वत:ला सावरले. मंडळाच्या इतरांना संपर्क साधला. अंगात असलेले टीशर्ट अन् बर्म्युडा याच कपड्यांवर घरातून बाहेर पडलो अन् घटनास्थळी गेलो, असे अरविंद कसबे यांनी सांगितले. 

घटनास्थळी मृतदेह पाहून हादरलो

आम्ही घटनास्थळी पोहचलो. तेव्हा बचावकार्य सुरू होते. सर्वत्र स्मशान शांतता होती. त्याचवेळी तेथे मृतदेह पाहून आम्ही हादरलो. ज्यांच्यासोबत काही तासांपूर्वी जल्लोष केला त्यांना मृतावस्थेत पाहून आम्हालाही अश्रू अनावर झाले. - अरविंद कसबे, पिंपळे गुरव

Web Title: Rejoicing in the night and shivering in the morning the incident narrated by a member of the board is mind-numbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.