श्वान आणि मनुष्यप्राण्यातील नात्यातून अध्यात्माकडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:14 AM2021-08-24T04:14:52+5:302021-08-24T04:14:52+5:30
पुणे : तणावपूर्ण जीवनात सध्या प्रत्येक जण आनंदासाठी आणि मन:शांतीसाठी धडपडतो आहे. श्वानांच्या सहवासात मानसिक शांतता लाभते आणि आध्यात्मिकतेचा ...
पुणे : तणावपूर्ण जीवनात सध्या प्रत्येक जण आनंदासाठी आणि मन:शांतीसाठी धडपडतो आहे. श्वानांच्या सहवासात मानसिक शांतता लाभते आणि आध्यात्मिकतेचा मार्ग गवसतो, हा संदेश लेखिका मंजिरी प्रभू यांनी ‘द डॉगटराईन आॅफ पीस’ या पुस्तकातून देण्याचा प्रयत्न केला आहे. श्वान आणि मनुष्यप्राणी यांच्या सहयोगावर आधारित संशोधनात्मक पुस्तकातून ‘श्वान: देवो भव:’ हा संदेश देण्यात आला आहे. मुक्या प्राण्यांकडून आपल्याला आयुष्यातील खरा अर्थ उमगतो आणि मन:शांती मिळते, हे पुस्तकात अधोरेखित केले आहे.
‘लोकमत’शी बोलताना डॉ. मंजिरी प्रभू म्हणाल्या, ‘मी आणि माझे कुटुंब गेल्या ३०-३५ वर्षांपासून श्वानांसाठी काम करत आहोत. भटक्या कुत्र्यांचे संगोपन, त्यांचे खाणे-पिणे, वैैद्यकीय मदत या स्वरुपात त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करत आहोत. श्वानांच्या सहवासात राहून आयुष्याचा खरा अर्थ उमगला, जगण्यातील संवेदनशीलता समजली. श्वान माझ्या गुरुस्थानी आहेत. श्वान आणि मनुष्याचे नाते १५,००० वर्षांपासूनचे आहे. या नात्याचा मी सखोल अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आपण सगळेच जण आनंदासाठी, मन:शांतीसाठी धडपडत असतो. मुक्या प्राण्यांच्या सहवासात हा आनंद मिळतो आणि अध्यात्माकडे जाण्याचा मार्गही गवसतो. श्वान आपल्यावर नि:स्वार्थी प्रेम करतात आणि आपणही तसेच प्रेम करायला शिकले पाहिजे, हेच मी पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. संशोधनात्मक अभ्यासातून ही थिअरी मांडली आहे.’
‘द डॉगटराईन पीस’ या पुस्तकात मेनका गांधी, डॉ. आनंदा बालयोगी भगनानी, भरत दाभोळकर अशा अनेक मान्यवरांच्या मुलाखती समाविष्ट करण्यात आल्या आहेत. प्राणीप्रेमी, शास्त्रज्ञ, अध्यात्मिक गुरु, योगा गुरु, पर्यावरणतज्ज्ञ अशा अनेकांचे अनुभव उधृत करण्यात आले आहेत. डॉ. मंजिरी प्रभू १९९० पासून या विषयावर पुस्तक लिहिण्याचा विचार करत होत्या. २००७ मध्ये त्यांनी पुस्तकाचे लेखन सुरु केले. मुक्या प्राण्यांचे संगोपन, त्यांचे पालनपोषण ही आपली जबाबदारी आहे, हे त्यांनी पुस्तकाच्या माध्यमातून अधोरेखित केले आहे. योगविद्याचार्य डॉ. आनंदा बालयोगी भवनानी यांच्या हस्ते सोमवारी या पुस्तकाचे डिजिटल प्रकाशन करण्यात आले.