प्लाझ्मासाठी कोरोना होऊन गेलेल्यांना शोधताना नातेवाईक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:11 AM2021-04-21T04:11:50+5:302021-04-21T04:11:50+5:30
सध्या कोरोना रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनबरोबरच प्लाझ्माचा तुटवडा भासत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गंभीर झालेल्या रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन दिल्यास ...
सध्या कोरोना रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनबरोबरच प्लाझ्माचा तुटवडा भासत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गंभीर झालेल्या रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन दिल्यास आराम मिळतो, मात्र जर रेमडेसिविरनेही आराम मिळाला नाही तर त्यावर प्लाझ्मा थेअरी करावी लागते. सध्याच्या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्लाझ्माचाही सर्वत्र तुटवडा असलेला पाहायला मिळत आहे. रेमडेसिविर इंजेक्शनप्रमाणे आपल्याला प्लाझ्मा फॅक्टरीमध्ये किंवा फार्मासिटीकल कंपनीमध्ये तयार करता येत नाही, तो कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या शरीरातूनच ठराविक दिवसांनंतर रक्तदानासारख्या पद्धतीने मिळवावा लागतो. राज्याची सध्याची प्लाझ्माची गरज पाहता कोरोनामुक्त झालेल्या जास्तीत जास्त रुग्णांनी प्लाझ्मादान करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात हे घडत नाही. त्यामुळे प्लाझ्माचा तुटवडा भासत आहे. ज्या रुग्णाला प्लाझ्माची गरज लागते, त्या रुग्णाच्या नातेवाईकांना प्लाझ्मा किंवा प्लाझ्मा डोनर शोधण्यासाठी प्रचंड धावाधाव करावी लागत आहे. मात्र अनेक वेळा प्लाझ्मा किंवा प्लाझ्मा डोनर शोधण्यात त्यांना अपयश येते व प्लाझ्माअभावी रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण होते.
--
कोविड सेंटरमधून दात्यांची यादी करावी
प्लाझ्माचा हा तुटवडा कमी करण्यासाठी शासनाने जर शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या व उपचारानंतर बऱ्या होणाऱ्या रुग्णांची प्लाझ्मा दान करण्यासाठी नावनोंदणी करून घेतली तर प्लाझ्मा दात्यांची मोठी यादी तयार होऊ शकते व गरजेनुसार या यादीतील प्लाझ्मा दात्यांकडून प्लाझ्मा घेऊन गरजू रुग्णांना देता येऊ शकतो.
शासकीय कोविड सेंटरवर प्लाझ्मा दात्यांची यादी बनवणे ही बिनखर्चाची योजना असून त्यासाठी फक्त कोविड केअर सेंटरवर उपचार घेऊन बऱ्या झालेल्या रुग्णाला सोडताना त्याच्याकडून प्लाझ्मा दाता म्हणून त्याचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, रक्तगट, कोविड पॉझिटिव्ह आल्याची तारीख व प्लाझ्मा दान करण्यास इच्छुक आहे की नाही इतकी जुजबी माहिती भरून घेणे गरजेचे आहे. प्लाझ्मा दात्यांची ही यादी जर प्रत्येक शासकीय कोविड सेंटरवर तयार करण्यात आली तर राज्यात चुकूनही प्लाझ्माची कमतरता भासणार नाही, असे सचिन तोडकर यांनी निवेदनात म्हटले आहे.