साहित्यासाठी विद्यार्थ्यांची परवडच, शिक्षकांनी जुळवले ठेकेदारांशी संबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 05:29 AM2017-09-27T05:29:43+5:302017-09-27T05:29:47+5:30
शालेय साहित्याच्या खरेदीत होणारा भ्रष्टाचार थांबवावा, म्हणून प्रशासनाने सुरू केलेल्या डीबीटी (थेट लाभार्थी योजना) योजनेचा बोजवारा उडाला असून अजूनही अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही.
पुणे : शालेय साहित्याच्या खरेदीत होणारा भ्रष्टाचार थांबवावा, म्हणून प्रशासनाने सुरू केलेल्या डीबीटी (थेट लाभार्थी योजना) योजनेचा बोजवारा उडाला असून अजूनही अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. शालेय साहित्याचेही यथातथाच वाटप झाले असून प्रशासनाकडूनच आता याकडे कानाडोळा केला जात असल्याच्या तक्रारी पालक करीत आहेत.
शाळेतील काही शिक्षकांनी ठेकेदारांशी हितसंबंध जुळवले असून विशिष्ट ठेकेदारांनाच शाळेत येऊन विद्यार्थ्यांना साहित्य व गणवेशवाटप करू दिले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाच्या वतीने बहुसंख्य शाळांमध्ये गणवेश व शालेय साहित्य दिले असल्याचे सांगण्यात येते, मात्र येरवडा तसेच शहराच्या अन्य उपनगरांमधील शाळांमध्ये हे साहित्य अजूनही पोहोचलेले नाही. ठेकेदारांकडून नव्या रंगाचे गणवेश तयार झाले नसून त्यामुळे त्यांनी शाळांमधील शिक्षकांबरोबर थेट संपर्क साधून आमच्याशिवाय अन्य कोणाला वाटप करू देऊ नका, असे सांगितले असल्याचे बोलले जात आहे.
महापालिकेच्या सुमारे २८७ शाळा असून त्यात जवळपास ८८ ते ९० हजार विद्यार्थी आहेत. त्या सर्वांना गणवेशाचे दोन जोड, तसेच शालेय साहित्याचे वाटप महापालिकेकडून करण्यात येते. दरवर्षी त्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे प्रशासनाने यावर्षीपासून विद्यार्थ्यांना कार्ड दिले आहे. त्यांनी ते कार्ड दाखवून त्यावर हव्या त्या दुकानातून त्यांना पसंत असेल, तशी खरेदी करणे अपेक्षित होते. त्यासाठी प्रशासनाने ४३ व्यावसायिक निश्चित केले होते.
या व्यावसायिकांनी थेट शाळांमध्ये जाऊन साहित्याचे वाटप करणे व विद्यार्थ्यांकडून कार्ड घेऊन ते स्वाईप करणे सुरू केले आहे. ते वाटप करीत असलेल्या साहित्याचा, गणवेशाचा दर्जा सांभाळण्याची काहीच तरतूद या योजनेत नसल्यामुळे सगळाच सावळा गोंधळ यात निर्माण झाला आहे. भांडार अधिकाºयांनी काही साहित्याची तपासणी करणार व दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करणार असे जाहीर केले. त्याप्रमाणे तीन व्यावसायिकांना नोटिसाही देण्यात आल्या, मात्र त्याचा काहीच उपयोग झालेला दिसत नाही.
बहुसंख्य शाळांमध्ये गणवेश व साहित्याचे वाटप झाले आहे. तपासणीत जे दोषी आढळले त्यांना नोटिसा दिल्या. फार जण दोषी आढळलेले नाहीत. ज्या शाळा राहिल्या आहेत तिथेही लवकरच वाटप होईल, याची काळजी घेतली जाईल. कोणाची तक्रार असल्यास त्यांनी भांडार विभागाशी संपर्क साधावा.
- तुषार दौंडकर, भांडार अधिकारी, महापालिका