मृताचे पाय धुऊन नातेवाइकांनी प्यायले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:12 AM2021-04-20T04:12:12+5:302021-04-20T04:12:12+5:30
कदमवाकवस्ती : सध्या कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे धार्मिक कार्यक्रम, यात्रा, लग्नसोहळा व अंत्यविधीच्या कार्यक्रमांवर निर्बंध आहेत. परंतु कदमवाकवस्तीत सत्तर वर्षीय ...
कदमवाकवस्ती : सध्या कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे धार्मिक कार्यक्रम, यात्रा, लग्नसोहळा व अंत्यविधीच्या कार्यक्रमांवर निर्बंध आहेत. परंतु कदमवाकवस्तीत सत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अल्पशा आजाराने मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी मृताचे पाय धुऊन पाणी प्यायल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तसेच, अंत्यविधीला शंभर लोक उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे.
कदमवाकवस्ती परिसरातील सामाजिक कार्यकर्ते राम भंडारी यांनी ही घटना उघडकीस आणली.
शासनाने अंत्यविधीसाठी वीस लोकांची परवानगी दिलेली आहे. परंतु पूर्व हवेलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या धोकादायकरीत्या वाढत असूनही नागरिक अंत्यविधीसाठी शेकडोंच्या संख्येने गोळा होत आहेत. सामाजिक कार्यकर्ते राम भंडारी यांनी ही गंभीर बाब लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या निदर्शनास आणली. तेव्हा त्यांनी या संदर्भात माहिती घेऊन दोषीविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. अशा प्रकारे कोरोना नियमांचे उल्लंघन केले जात असेल तर याबाबत माहिती नागरिकांनी लोणी काळभोर पोलिसांना द्यावी. आमचे अधिकारी दहा मिनिटांत कारवाईसाठी परिसरात येतील, अशी ग्वाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.