कत्तलखान्यात नेणाऱ्या बैलांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:10 AM2021-01-18T04:10:30+5:302021-01-18T04:10:30+5:30
पुणे-नाशिक महामार्गावरील पेठ येथे मंचर पोलिसांनी चाकण येथून जुन्नर येथे कत्तलीसाठी नऊ जनावरे घेऊन जाणारा टेम्पो पकडला आहे. जनावरांची ...
पुणे-नाशिक महामार्गावरील पेठ येथे मंचर पोलिसांनी चाकण येथून जुन्नर येथे कत्तलीसाठी नऊ जनावरे घेऊन जाणारा टेम्पो पकडला आहे. जनावरांची अवैध वाहतूक करणारा चालक सोपान विष्णू नायकोडी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कौस्तुभ उमेश सोमवंशी यांनी फिर्याद दिली आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मानद पशु कल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी फोन करून एका टेम्पोतून चाकण येथून मोहम्मद मजहर अकिल कुरेशी (रा. जुन्नर) याने कत्तलीसाठी जनावरे भरले आहे. ती चाकण येथून पेठ मार्गे जुन्नरला जाणार आहे, अशी माहिती कौस्तुभ सोमवंशी यांना दिली. सोमवंशी यांनी ही माहिती मंचर पोलिसांना दिली. सचिन वाल्मीक पठारे, अतुल वसंत थोरात, सचिन सुधाकर लोखंडे यांना ही माहिती देऊन पुणे-नाशिक महामार्गावरील हॉटेल रानवारा पेठ येथे बोलावून घेतले. त्यानंतर लगेचच पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, पोलीस जवान एस. व्ही. गवारी, होमगार्ड विशाल रोडे त्या ठिकाणी आले. सव्वाबाराच्या सुमारास मिळालेल्या माहितीचा टेम्पो येताना दिसला. मंचर पोलिसांनी त्याला थांबून विचारपूस केली असता वाहनचालकाने ९ देशी बैल जनावरे आहेत व जुन्नर येथे घेऊन चालले असल्याचे सांगितले. टेम्पोमध्ये ९ बैल जनावरे दाटीवाटीने क्रूरपणे रस्सीने जखडून बांधल्याने त्यातील काही जनावरे इतर जनावरांच्या पायाखाली तुडवली जात असल्याचे दिसले. वाहन चालकाकडे कोणत्याही जनावराचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले फिटनेस सर्टिफिकेट नसल्याने मंचर पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले आहे. सोपान विष्णू नायकोडी (रा. तेजेवाडी, ता. जुन्नर), मोहम्मद मजहर अकील कुरेशी (रा. जुन्नर) याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.