घरकुलचे लेखा परीक्षण ‘सारथी’वर प्रसिद्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2015 05:01 AM2015-05-07T05:01:53+5:302015-05-07T05:01:53+5:30
घरकुल प्रकल्पाचे मनपाच्या मुख्य लेखापरीक्षकांनी केलेले लेखापरीक्षण ‘सारथी’ या प्रणालीवर प्रसिद्ध करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली आहे.
पिंपरी : जेएनएनयूआरएम अंतर्गत असलेल्या घरकुल प्रकल्पाचे मनपाच्या मुख्य लेखापरीक्षकांनी केलेले लेखापरीक्षण ‘सारथी’ या प्रणालीवर प्रसिद्ध करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे केली आहे.
केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू शहरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत (जेएनएनयूआरएम) राबविण्यात आलेल्या घरकुल प्रकल्पात बेकायदेशीरपणा व नियमबाह्यता झाल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकांकडून मनपाचे साप्ताहिक लेखापरीक्षण होते. याबाबत वेळोवेळी स्थायी समितीलाही कळविले जाते. आढळून आलेली नियमबाह्यता व अयोग्यता यांविषयी स्थायी समितीला अहवाल दिला जातो.
या सर्व बाबी महापालिकेसमोर ठेवण्यात येतात. परंतु, आजपर्यंत मनपा मुख्य लेखापरीक्षकांकडून घरकुल प्रकल्पाचे केलेले लेखापरीक्षण हे महापालिकेसमोर ठेवण्यात आलेले नाही. घरकुल प्रकल्पात बेकायदेशीरपणा, नियमबाह्य गैरप्रकार असल्याचे निदर्शनास आले असून, केंद्र शासन राज्य शासन व मनपा यांचा एकत्रित शेकडो कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. तसेच ५१ कोटी रुपयांचा वाढीव खर्चही झाला आहे. घरकुलबाबतची स्थिती सर्वसामान्यांना समजणे गरजेचे आहे. यासाठी त्याचे लेखापरीक्षण सारर्थी प्रणालीवर प्रसिद्ध करावे. (प्रतिनिधी)