‘स्मार्ट व्हिलेज’च्या विकासकामांचे लोकार्पण
By admin | Published: May 1, 2017 02:35 AM2017-05-01T02:35:55+5:302017-05-01T02:35:55+5:30
मावळ तालुक्यातून पहिल्या स्मार्ट व्हिलेजसाठी निवड झालेल्या वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा शनिवारी पुणे
लोणावळा : मावळ तालुक्यातून पहिल्या स्मार्ट व्हिलेजसाठी निवड झालेल्या वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा शनिवारी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते शनिवारी पार पडला.
यावेळी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बांधकाम सभापती प्रविण माने महिला व बालकल्याण समिती सभापती राणी शेळके, समाजकल्याण समिती सभापती सुरेखा चौरे, वाकसई गावच्या सरपंच सोनाली जगताप, उपसरपंच बाळासाहेब येवले, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, बाळासाहेब भानुसघरे, लक्ष्मण शेलार आदी व्यासपिठावर उपस्थित होते.
देवकाते म्हणाले, मावळ तालुक्यात अनेक वषार्पासून भाजपाची सत्ता असली तरी मागील पाच वर्षात राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मावळला दोनशे कोटी रुपयांचा विकास निधी दिला आहे. भविष्यात देखील मावळला विकासापासून वंचित ठेवणार
नाही.
विदर्भाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी पुणे जिल्ह्यातील विविध पाणी योजना महाराष्ट्र शासनाने थांबविल्याने वाकसई परिसरातील कार्ला प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बारगळली आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे पाण्यासाठी हाल झाले आहेत. ही योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. वळसे पाटील म्हणाले, वाकसई गाव हे भौगोलिकदष्ट्या डोंगर उतारावर असूनही ग्रामपंचायतीने गावात चार वर्षात चार कोटीची तब्बल ६४ विकासकामे करत मावळातील स्मार्ट व्हिलेज होण्याचा मान मिळविला ही गौरवाची बाब आहे.
प्रास्ताविक सरपंच सोनाली जगताप यांनी केले. सुभाष भानुसघरे व किरण हुलावळे यांनी सुत्रसंचालन केले. तंटामुक्तीचे अध्यक्ष वसंत विकारी यांनी आभार मानले. (वार्ताहर)