‘यशवंत’ची जमीन मुक्त करा!
By Admin | Published: April 25, 2016 02:40 AM2016-04-25T02:40:45+5:302016-04-25T02:40:45+5:30
गेली चार वर्षे राजकारण्यांनी दिलेल्या आश्वासनांवर यशवंत साखर कारखाना सुरू न झाल्याने अखेर कार्यक्षेत्रातील सभासदांच्या मुलांनी तो सुरू करण्यासाठी एल्गार पुकारला आहे.
लोणी काळभोर : गेली चार वर्षे राजकारण्यांनी दिलेल्या आश्वासनांवर यशवंत साखर कारखाना सुरू न झाल्याने अखेर कार्यक्षेत्रातील सभासदांच्या मुलांनी तो सुरू करण्यासाठी एल्गार पुकारला आहे. रविवारी झालेल्या निर्धार मेळाव्यात ‘यशवंत’ची जमीन मुक्त करावी यांसह पाच महत्त्वाचे ठराव करण्यात आले.
यशवंत चालू करावयाचा, या निर्धाराने कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी ‘मी यशवंत बोलतोय...’ असे भावनिक आवाहन करून ‘यशवंत बचाव कृती समिती’ स्थापन केली आहे. यांमध्ये सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत. परंतु राजकीय जोडे
बाजूला ठेवून यशवंत कारखाना हाच एक पक्ष मानून सभासदांच्या तरुण मुलांनी पक्षविरहित काम करण्याचे ठरवले आहे.
या कृती समितीशी कुठल्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही. गावातील, पक्षातील किंवा इतर कुठल्याही प्रकारची गटबाजी न करता समिती काम करणार आहे.
यशवंत कार्यक्षेत्रांतील बहुतांश गावांमध्ये जनजागृती करून या तरुणांनी रविवारी थेऊर येथे कारखाना आवारांत दशरथ बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली निर्धार मेळावा घेतला.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना सर्वपक्षीय मान्यवरांनी यशवंतप्रश्नी मार्ग काढण्यात सर्व राजकीय पक्षाचे धोरण चुकलेले असल्याने कारखाना गेली चार वर्षे बंद असल्याचे मान्य केले. यापुढे मात्र यापूर्वी झालेल्या सर्व बाबींना पूर्णविराम देऊन फक्त यशवंत सुरू होण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करावयाचे, असे सांगितले.
मेळाव्यास माजी आमदार अशोक पवार, जगन्नाथ शेवाळे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश म्हस्के, सुरेश घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वसंत कंद, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदू काळभोर, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. यशवंत सुरू करण्याबाबत यांपुढील आवश्यक ते सर्व निर्णय घेण्यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार
बाबूराव पाचर्णे, माजी आमदार अशोक पवार, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश म्हस्के, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांची कमिटी स्थापन करण्यात आली. लक्ष्मण भोंडवे यांनी सूत्रसंचालन केले.(वार्ताहर)