जटांच्या विळख्यात अडकलेल्या महिलेची मुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 06:49 PM2019-01-03T18:49:52+5:302019-01-03T18:50:41+5:30
नकळत्या वयातच सुभद्रा यांच्या डोक्यात एक छोटी जट सापडल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी ती देवीची जट असल्याने कापायची नाही, असा निर्णय घेतला आणि...
भोर : देवाच्या नावाने डोक्यावरील केसांच्या जटा वाढवून अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या महिलेला भोर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आज मुक्त केले. भोर तालुक्यातमध्ये ही आतापर्यंत सहावी घटना असून अंनिसच्या या कामामुळे भोर तालुक्याची अंधश्रद्धारुपी जटांच्या विळख्यातून मुक्ततेकडे वाटचाल सुरू झाली आहे.
सुभद्रा बांदल (वय ५५, गोकवाडी, ता. भोर) असे जटा निर्मलून करणाऱ्या महिलेचे नाव आहे. नकळत्या वयातच सुभद्रा यांच्या डोक्यात एक छोटी जट सापडल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी ती देवीची जट असल्याने कापायची नाही, असा निर्णय घेतला आणि सुभद्रा यांना देवी कोपणार या भीतीने जट वाढविण्यात भाग पडले. देवीच्या नावाने वाढविलेल्या सुभद्रा यांना त्याच जटेमुळे शाळेत जाण्यापासून ते नोकरी-धंदा करण्यापर्यंत वंचित राहावे लागले आणि त्यांचे अवघे आयुष्य जणू वायाच गेले. वय वाढेल तसे सुभद्रा यांना वेगवेगळ्या शारीरिक व्याधी जडायाला लागल्या. जटेमुळे मानेचा त्रास असह्य व्हायला लागला. शिवाय डोक्यातील उवा यामुळेही त्या प्रचंड अस्वस्थ व्हायला लागल्या. मात्र जटा कापल्या तर देवीचा कोप होईल व आपल्यासह आपल्या कुटुंबीयांवर मोठे संकट येईल, या भीतीने जटा कापायचे त्यांचे धाडस होत नव्हते.
मात्र, भोर येथील कॉ. ज्ञानोबा घोणे आणि डॉ. अरुण बुरांडे यांनी सुभद्रा यांना धीर दिला. वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगत त्यांच समुपदेशन केले. त्यानंतर अंनिसचे मिलिंद देशमुख आणि नंदिनी जाधव, हनुमंत पोळ यांनी त्यांना जट काढण्यासाठी अखेर तयार केले आणि साऱ्यांच्या साक्षीने सुभद्रा यांच्या जटा काढत त्यांची अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्तता केली. जट निर्मूलन करणाऱ्या या सहाव्या महिला असून आतापर्यंत जिल्ह्यामध्ये अंनिसने ९६ महिलांची मुक्तता केली आहे.
जटा असलेल्या महिला कुणाच्या पाहण्यात आल्या असतील तर त्यांनाही या जोखडातून मुक्त करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्यांशी संपर्क करावा, असे आवाहन नंदिनी जाधव यांनी केले आहे.