कोरोना रुग्णांसाठी रिलायन्सकडून ८७५ बेड सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:10 AM2021-04-27T04:10:51+5:302021-04-27T04:10:51+5:30
पुणे : मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे वैद्यकीय व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. या संकटाच्या काळात कोरोनाचा सामना करणाऱ्या ...
पुणे : मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे वैद्यकीय व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. या संकटाच्या काळात कोरोनाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्र सरकारला बळ देण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनने ८७५ बेड सज्ज केले आहेत.
मुंबई महापालिकेच्या मदतीने एचएन रिलायन्स फाऊंडेशनने नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडिया, मुंबई येथे कोरोना रुग्णांसाठी ६५० बेडची व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे १५ मेपासून अतिदक्षता विभागासाठी नव्या १०० बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच, सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल १ मेपासून ५५० बेडच्या वार्डाच्या व्यवस्थापनावर लक्ष देणार आहे. फाऊंडेशनकडून ६५० बेडची व्यवस्था कोरोना रुग्णांसाठी करण्यात येणार आहे. रुग्णांच्या व्यवस्थेसाठी ५०० जण कार्यरत राहणार आहेत. त्यात डॉक्टर, नर्स, अवैद्यकीय कर्मचारी यांचा समावेश आहे. या उपक्रमाचा संपूर्ण खर्च रिलायन्स फाऊंडेशनकडून करण्यात येणार आहे. नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडिया आणि सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील.
गेल्या वर्षी रिलायन्स फाऊंडेशनने महापालिकेच्या मदतीने सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी २२५ बेडचा स्वतंत्र वार्ड सुरू केला होता. रिलायंस फाऊंडेशनने त्यानंतर १२५ बेड वाढवले. त्यात ४५ आयसीयू बेड रिलायंस फाऊंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये आहेत. आतापर्यंत १४५ आयसीयू बेडची व्यवस्था फाऊंडेशनने केली आहे. रिलायन्सच्या अध्यक्ष नीता अंबानी म्हणाल्या की, कोरोनाकाळात देशाच्या मदतीसाठी रिलायन्स फाऊंडेशन सदैव सज्ज आहे. फाऊंडेशनने कोरोना रुग्णांसाठी ८७५ बेडची व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिव, दमण, नगर हवेलीला आम्ही दररोज ७०० एमटी आॅक्सिजनचा मोफत पुरवठा करत आहोत. ही मदत आणखी वाढवण्याचा प्रयत्न आहे, असेही त्या म्हणाल्या.
फोटो- नीता अंबानी