गृहिणींना दिलासा; निर्णय घेताना आमचाही विचार करावा, गॅस वितरक कंपनीचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 02:39 PM2024-03-10T14:39:26+5:302024-03-10T14:39:37+5:30
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात झाली असून तो आता ८०५ रुपयांना मिळणार
पुणे : घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात झाल्यामुळे महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. यामुळे ९०५ रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आता ८०५ रुपयांना मिळणार आहे. मात्र या निर्णयामुळे गॅस वितरक कंपन्यांना भुर्दंड बसला आहे.
आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्ट करून हा निर्णय जाहीर केला. त्यात त्यांनी ‘महिला दिनानिमित्त आमच्या सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे देशातील लाखो गृहिणींना दिलासा मिळेल. त्यांच्यावरचा आर्थिक भार हलका होईल.’
अचानक केलेल्या या घोषणेमुळे गॅस वितरक कंपन्यांनी आधीच्या दराने विकत घेतलेले सिलिंडर त्यांना १०० रुपये सवलतीच्या दराने वितरित करावे लागणार असल्याने याचा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
फूल ना फुलाची पाकळी असेना, १०० रुपये कमी झाले तरी थोडाफार आर्थिक भार कमी झाला आहे. त्यामुळे या निर्णयाचे मी स्वागत करत असून, या निर्णयामुळे बजेटमध्ये थोडीशी बचत होईल. - रमा चरणकर
सिलिंडरची किंमत १०० रुपयांनी कमी झाली असली तरी वाढत्या महागाईचा डोंगर मात्र तसाच आहे. आज दैनंदिन लागणाऱ्या गोष्टी जसं डाळीसाळींचा खर्च आणि विविध वस्तूंवर टॅक्स भरावा लागतो. कधी कधी महिना अखेर आर्थिक बजेट सांभाळता सांभाळताना कसरत होते.- संगीत उके, गृहिणी
असे निर्णय घेताना नागरिकांसोबतच आमचाही विचार करावा, अशी अपेक्षा आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे आम्हा गॅस वितरक कंपनीला १०० रुपये प्रतिगॅस असे नुकसान सहन करावे लागत आहे. हा निर्णय घेताना सर्वसामान्य महिलांचा विचार केला गेला मात्र गॅस वितरक महिलांचा विचार कोण करणार? - उषा पुनावाला, अध्यक्ष, ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य