आमदार राहुल कुलांना दिलासा! भीमा पाटस मध्ये गैरव्यवहार नाही; राज्य शासनाचा निर्वाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 07:21 PM2023-07-28T19:21:30+5:302023-07-28T19:21:58+5:30
या निर्णयाचे दौंडमध्ये फटाके फोडून स्वागत करण्यात आले...
केडगाव (पुणे) : भीमा पाटस कारखान्यामध्ये कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार राहुल कुल यांनी कसलाही घोटाळा केला नसल्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील विधान परिषदेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले आहे. या निर्णयाचे दौंडमध्ये फटाके फोडून स्वागत करण्यात आले.
यासंदर्भात चार महिन्यांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी भीमा पाटस कारखान्यामध्ये ५०० कोटी रुपयांचा मनी लॉड्रिंग घोटाळा झाल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली होती. यासंदर्भात राऊत यांनी कुल यांच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. तसेच कुल यांच्या मतदारसंघातील वरवंड येथे येऊन भ्रष्टाचाराची पोलखोल केली होती. स्वतः कारखान्यावर जाऊन येथील संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मधुकर शितोळे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत स्टंटबाजी केली होती. यानंतर आज विधान परिषदेमध्ये ॲड. मनीषा कायंदे, अमिषा पाडवी व सचिन अहिर यांनी सहकार मंत्र्यांकडे खुलासा मागितला होता. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की हे खरे नसून २०२१-२२ च्या वैधानिक लेखापरीक्षणावर कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे निदर्शनात येत आहे. तसेच २०२२-२३ चा लेखा परीक्षण अहवाल अद्याप पूर्ण झालेला नाही असेही म्हटले आहे. त्यामुळे राज्य शासनाने एक प्रकारे कुल यांना क्लीन चिट दिली आहे. शासनाच्या या निर्णयाचे दौंडमध्ये फटाके फोडून स्वागत करण्यात आले.
यासंदर्भात आमदार कुल म्हणाले की, यामध्ये नवीन असे काहीच नव्हते. जेव्हा संजय राऊत यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला त्यावेळेस कसलेही नेतृत्व नसताना तालुक्यातील ७ हजार शेतकऱ्यांनी त्यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. ज्या बाजार समितीचा प्रचार करण्यासाठी संजय राऊत आले ती बाजार समिती तेथील मतदारांनी प्रथमच माझ्या ताब्यामध्ये दिली. त्यामुळे मी हक्कभंग समितीचा अध्यक्ष झाल्याने खासदार संजय राऊत यांनी वैफल्यातून आरोप केला असावा.
कुल यांची हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी निवड आणि आरोपाला सुरुवात-
राऊत यांच्यावरील कारवाई करण्यासाठी शासनाने आमदार राहुल कुल यांची हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी निवड केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच राऊत यांनी कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. कुलांची हक्कभंग समिती अध्यक्षपदी निवड झाल्यानेच सदर आरोप केला असावा. आरोपांमध्ये कसलेही तथ्य नसल्याने राऊत हे आता तोंडघशी पडले असल्याची चर्चा दौंड तालुक्यात रंगली आहे.