पुणे शहरात दुपारच्या उकाड्यानंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस
By श्रीकिशन काळे | Published: April 20, 2023 03:31 PM2023-04-20T15:31:56+5:302023-04-20T15:34:45+5:30
उष्णतेने हैराण झालेल्या पुणेकरांना या जलधारांनी थोडासा दिलासा मिळाला...
पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून किमान व कमाल तापमानात प्रचंड वाढ होत आहे. दुपारी आकाश निरभ्र होते अन् साडेतीन वाजता अचानक आकाशात ढग जमा झाले आणि गारांसह पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या पुणेकरांना या जलधारांनी थोडासा दिलासा मिळाला.
दरम्यान, पूर्वी पुण्यात उन्हाळ्यात किमान तापमान २० अंशाच्या आसपास असायचे. परंतु, आता हे तापमान २५ च्याही पुढे जात आहे. अजून संपूर्ण मे महिना यायचा असून, आताच सकाळी देखील प्रचंड उकाडा जाणवत आहे. उष्माघाताचा परिणाम नागरिकांवर होऊ लागला आहे. त्यामुळे शक्यतो दुपारी घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामानशास्त्र विभागाकडून करण्यात येत आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून शहरातील ठिकठिकाणचे तापमान नोंदविले जात आहे. त्यासाठी खास स्टेशन्स उभारले आहेत. शहरात तापमान डिस्प्ले करणारे १६४ ठिकाणे आहेत. यामध्ये महापालिका, आयएमडी आणि जिल्हा प्रशासनाचा समावेश आहे. पुणे शहरासह राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी झाली. त्यामध्ये या लाटेविषयीची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे.
पुणे शहरातील उन्हाळा दिवसेंदिवस खूप तीव्र होत आहे. मध्यवर्ती तर तपामानाचा पारा चाळीशीच्या पार गेला आहे. कोरेगाव पार्क, वडगावशेरी, मगरपट्टा या ठिकाणी चाळीस तापमान नोंदवले जात आहे. खरंतर कोरेगावपार्कला झाडी माेठ्या प्रमाणावर आहे. तरी देखील तेथे तापमान अधिक नोंदवले जात आहे. बुधवारी कोरेगाव पार्क येथे ४२.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तापमानाचा पारा अधिक वर जाणार असून, उकाडा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सकाळी किमान ३० तर बारा वाजता ३६ अंशांवर
शहरात गुरूवारी सकाळी ९ वाजता किमान तापमान मगरपट्टाला ३० तर शिवाजीनगरला २७.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यानंतर १२ वाजता हेच तापमान वाढून शिवाजीनगरला ३५ तर मगरपट्टा येथे ३६.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. यावरून तीन तासांमध्ये झपाट्याने तापमान वाढल्याचे दिसून येत आहे.
उष्माघाताचा बसेल फटका
सकाळपासूनच उकाडा अधिक जाणवत आहे. दुपारी उन्हात फिरताना अनेकजणांना चक्कर येत आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना शक्यतो पांढरे कपडे घालावेत. महत्त्वाचे काम नसेल तर दुपारी घराबाहेर पडूच नये, असे आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले आहे.
वीज बंद; घरात अंगाची लाहीलाही
गुरूवारी शहरात अनेक ठिकाणी महावितरणकडून वीजपुरवठा बंद केला होता. त्यामुळे घरात बसलेल्यांच्या अंगाची लाहीलाही झाली. घामाच्या झारा असह्य झाल्या. किमान उन्हाळ्यात तरी वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.