Guillain Barre Syndrome: पुणेकरांना दिलासा! जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ नाही, एकूण १११ संशयित रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 20:32 IST2025-01-28T20:30:41+5:302025-01-28T20:32:59+5:30
बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, पोटदुखी, उलटी, जुलाब, आशक्तपणा जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्याने औषधोपचार घ्यावे

Guillain Barre Syndrome: पुणेकरांना दिलासा! जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ नाही, एकूण १११ संशयित रुग्ण
पुणे: पुणे शहरात गुईलेन बॅरे सिंड्रोम या नव्या विषाणूचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसली आहे आहे. या विषाणूचे आतापर्यंत १११ संशयित रुग्ण शहरात आढळले आहेत. या रुग्णांना गुईलेन बॅरे सिंड्रोमची बाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ०५ रुग्ण, पुणे महापालिका हद्दीत ८६, तर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत १२ तसेच इतर जिल्ह्यातील ८ रुग्ण असे एकू्न १११ रुग्णांवर सध्या पुणे शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. १११ रुग्णांमध्ये ७७ पुरुष रुग्ण तर ३४ महिला रुग्ण असून यापैकी १३ रुग्ण हे अतिदक्षता (व्हेंटीलेटर) विभागात आहेत, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
दरम्यान, मंगळवारी नव्याने रुग्ण वाढले नाहीत. यामुळे दिलासा नागरिकांना काहीसा मिळाला आहे. एकूण रुग्णसंख्येत ० ते ९ आणि १० ते १९ वयोगटातील मुलांची संख्या अधिक ३७ इतकी आहे. तर ६० ते ६९ वयोगटातील व्यक्तींची संख्या ८ आहे. त्यामुळे नागरिकांनी लहान मुलांसह वृध्द व्यक्तींची (प्रतिकारशक्ती कमी असलेले) विशेष काळजी घ्यावी. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, पोटदुखी, उलटी, जुलाब, आशक्तपणा जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्याने औषधोपचार घ्यावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
घाबरू नका; परंतु त्वरित वैद्यकीय मदत घ्या
गुइलेन-बॅरे सिंड्रोम गंभीर असू शकतो; परंतु योग्य उपचारांनी लोक बरे होऊ शकतात. ही एक दुर्मीळ न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. ज्यामुळे हातपाय, मान, चेहरा आणि डोळे कमकुवत होतात. त्यामुळे मुंग्या येणे किंवा बधिर होणेदेखील होऊ शकते. गंभीर प्रकरणांमध्ये चालणे, गिळणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणेदेखील होऊ शकते. जर स्नायूंमध्ये अशक्तपणा, मुंग्या येणे किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवला तर घाबरू नका; परंतु त्वरित वैद्यकीय मदत घ्या असे डॉक्टरांनी सांगितले आहे. योग्यवेळी उपचार घेतल्याने हा आजार बरा होऊ शकतो. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अशा रुग्णांवर आयव्हीआयजी किंवा प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या उपचारांमुळे बरे होण्याची शक्यता वाढते आहे, हे सिद्ध झाले आहे. यामुळे दूषित अन्न खाणे बंद करावे. पाणी स्वच्छ आणि जंतुविरहित असावे. या संसर्गामुळे जुलाब आणि पोटदुखी यांसारखी लक्षणे देखील होऊ शकतात असेही डॉक्टर म्हणाले आहेत.