Maharashtra Winter: पुणेकरांना गारठ्यापासून दिलासा! २ दिवसांपूर्वी तापमान ९ अंशावर, ते आज थेट १७ अंशावर
By श्रीकिशन काळे | Published: December 2, 2024 03:24 PM2024-12-02T15:24:43+5:302024-12-02T15:32:29+5:30
राज्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच जाणवत होता, पण आता थंडी ओसरली असून, तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे
पुणे: गेल्या आठवड्यापासून थंडीने कुडकुडणाऱ्या पुणेकरांना सोमवारी (दि.२) दिलासा मिळाला. ‘फेंगल’ या चक्रीवादळामुळे थंडी चांगलीच वाढली होती. पण हे वादळ आता कमकुवत झाले असल्याने थंडीही झपाट्याने कमी झाली. दोन दिवसांपूर्वी पुण्याचे किमान तापमान ९ अंशावर होते, ते आज १७ अंशावर गेले आहे.
राज्यामध्ये थंडीचा कडाका चांगलाच जाणवत होता, पण आता थंडी ओसरली असून, किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे थंडीपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या बंगालच्या उपसागरातील ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे राज्यात ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यामध्ये गारठा कमी झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र हुडहुडी कायम आहे. आज (दि. २) राज्यात ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सोमवारी म्हणजे आज (दि.२) राज्यात ढगाळ हवामान आहे. किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. त्यातच कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, आणि मराठवाड्याच्या धाराशिव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यत वर्तविण्यात आली.
पुण्यातील किमान तापमान
एनडीए : १६.३
हवेली : १६.९
शिवाजीनगर : १७.४
लोणावळा : १८.९
हडपसर : १९.६
कोरेगाव पार्क : २०.१
वडगावशेरी : २१.३
मगरपट्टा : २१.४