पुण्यातील लाॅकडाऊनमध्ये शिथिलता ; संचेती चाैकात वाहनांच्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 02:14 PM2020-05-04T14:14:30+5:302020-05-04T14:15:54+5:30
पुण्यातील लाॅकडाऊन काहीसे शिथिल झाले असल्याबराेबर नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करण्यास सुरुवात केली.
पुणे : पुण्यातील लाॅकडाऊन आज पासून काहीसे शिथिल केल्यानंतर लगेचच नागरिकांनी माेठ्याप्रमाणावर रस्त्यावर गर्दी करण्यास सुरुवात केली. पुण्यातील संचेती चाैकात सकाळच्यावेळेला माेठी वाहतूक काेंडी झाली हाेती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हाेता. पाेलीस प्रशासन देखील या रांगा बघून हतबल झाले हाेते. नागरिक कुठलेही कारण सांगून घराबाहेर पडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांना अशी गर्दी केल्यास काेराेनाचा प्रसार कसा राेखणार असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.
काेराेनाची वाढती संख्या लक्षात घेता केंद्र शासनाकडून देशभरातील लाॅकडाऊनमध्ये 17 मे पर्यंत वाढ केली. देशभरातील जिल्ह्यांचे रेड, ऑरेंज, ग्रीन झाेन असे वर्गीकरण करण्यात आले असून त्यात विविध प्रकारच्या सवलती देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने मात्र यात आणखी एका झाेनची वाढ केली. त्यात मुंबई महानगर रिजन, पुणे महानगर रिजन आणि मालेगावचा समावेश करण्यात आला. या नव्या झाेनसाठी वेगळे नियम करण्यात आले आहेत. पुणे शहर संपूर्ण रेड झाेन मध्ये असले तरी पुण्यातील काही भागातच काेराेनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. इतर भागात काेराेनाचा प्रसार नसल्याने पुण्यातील लाॅकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यात जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. एका रस्त्यावरील किंवा गल्लीमधील पाचच दुकाने मात्र यात सुरु राहणार आहेत. त्याचबराेबर सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच ही दुकाने सुरु राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. संध्याकाळी 7 नंतर संपूर्ण शहरात संचारबंदी लागू हाेणार आहे.
असे असले तरी कुठल्याही खासगी कंपन्या किंवा खाजगी कार्यालये सुरु केलेली नसताना देखील अनेक पुणेकर आज सकाळीच रस्त्यावर बाहेर पडले हाेते. त्यामुळे रस्त्यावर वर्दळ वाढली हाेती. संचेती उड्डाणपुलावर वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. त्यामुळे काहीकाळ वाहतूक काेंडी या ठिकाणी झाली हाेती.