पुणे महापालिकेचा रेस्टॉरंट चालकांना मोठा दिलासा : पार्सल सेवा सातनंतरही राहणार सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 01:17 PM2020-09-25T13:17:13+5:302020-09-25T13:18:17+5:30
शुक्रवारी आदेश निघण्याची शक्यता
पुणे: कोरोना टाळेबंदीच्या काळात सलग सहा महिने सगळी हॉटेल्स बंद होती. त्यानंतर अनलॉकच्या काळात सर्व हॉटेल्सला पार्सल सेवेची परवानगी मिळाली. त्यासाठी सायंकाळी ७ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली. मात्र तरीदेखील रेस्टॉरंट चालकांना महापालिका अधिकाऱ्यांच्या छळाला सामोरे जावे लागत होते. याबाबत त्यांनी थेट महापालिका आयुक्तांकडेच तक्रार करत रेस्टॉरंट खुले ठेवण्याची वेळ वाढवून देण्याची मागणी पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेल्स असोसिएशन केली होती. या मागणीला महापालिका आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवला असून हॉटेल्समधील पार्सल सेवेला सायंकाळी ७ नंतरही सुरु ठेवण्याची परवानगी दिल्याची माहिती आहे. याबाबतचा नवीन आदेश आज निघण्याची शक्यता आहे.
पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी व किशोर सरपोतदार, संदीप लांबा यांंनी यासंदर्भात गुरूवारी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेतली व त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. अनेक अडचणी सहन करत रेस्टॉरंट चालक कसाबसा व्यवसाय करत आहेत. काहीजण व्यवसाय बंद करण्याचा पर्याय पसंत करत आहेत. असे असताना त्यांंना साह्य करण्याऐवजी त्रास दिला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
बहुतांश लोक रात्रीचे जेवण बाहेरून मागवायचे असेल तर सायंकाळी ७ नंतरच तसा निर्णय घेतात. त्यामुळे रेस्टॉरंट खुले ठेवण्याची वेळ सायंकाळी ७ ऐवजी रात्री ११ वाजता करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली होती. चालक आरोग्य सुरक्षेचे सर्व नियम कटाक्षाने पाळत आहेत. कोणीही ग्राहकांना आत प्रवेश देत नाही. काऊंटरवरूनच पार्सल दिले जाते. गर्दी होऊ दिली जात नाही. सुरक्षित अंतर, सँनिटायझर, मास्क या सर्व साधनांचा ऊपयोग ग्राहक व कर्मचारी दोघेही करतील याबाबत चालक दक्षता घेतात, त्यामुळे कारवाई थांबवावी व वेळ वाढवून द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.
पुणे महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील विद्यार्थी तसेच नोकरदार वर्गाची गैरसोय टळली जाणार आहे.या अगोदर सातपर्यंतच मुदत असल्यामुळे या वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
शहरातील हॉटेल व्यावसायिकांच्या आर्थिक कोंडीचा व शहरातील परगावचे विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग यांचा विचार करून हॉटेल्समधील पार्सल सेवेला सातनंतरही सुरु ठेवण्याची परवानगी महापालिका आयुक्तांनी दिली असल्याची खात्रीशीर माहिती आहे.
---///
रेस्टॉरंट व्यवसाय आर्थिक अडचणीत आला आहे. अनेक व्यवसाय या व्यसायावर अवलंबून आहेत. आम्हाला नियमावली द्या व किमान उपस्थितीत रेस्टॉरंट, हॉटेल्स सुरू करण्याची परवानगी देण्याबाबत विचार करा. ते नाही तर पार्सल सेवेची वेळ तरी वाढवून द्या.
गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉपुणे महापालिका रंट अँड हॉटेल असोसिएशन.