नागरिकांना दिलासा! वासुली फाटा येथे पोलीस चौकी सुरू; 'लोकमत'च्या वृत्ताची घेतली गेली दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 12:40 PM2023-08-15T12:40:15+5:302023-08-15T12:41:07+5:30
वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्यांना चाप बसवण्यासाठी व परिसरातील उद्योगधंद्यांना संरक्षण मिळावे यासाठी वासुली फाटा ( ता. खेड ) येथे पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे...
आंबेठाण (पुणे) : चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोन मध्ये मोठ्या संख्येने कारखानदारी वाढल्याने नागरिकीकरणही झपाट्याने वाढीस लागले आहे, स्थानिकांचे उद्योग व्यवसाय वाढीस लागले. त्यामुळे याभागात आर्थिक सुबत्ता आली. आणि त्यापाठोपाठ गुन्हेगारी, अवैध धंदे, लुटमार, चोऱ्यामाऱ्या आदी अशा दूष्प्रवृत्तींना ऊत आला. वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्यांना चाप बसवण्यासाठी व परिसरातील उद्योगधंद्यांना संरक्षण मिळावे यासाठी वासुली फाटा ( ता. खेड ) येथे पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोनमधील भांबोली व वासुली फाटा हे व्यापारी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे, या ठिकाणी बाजारपेठ असल्याने नागरिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच एमआयडीसीमुळे आजूबाजूला असणाऱ्या गावांना तसेच वाड्या वस्त्यांना मोठे महत्त्व आले आहे. तसेच व्यापार मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याच प्रमाणात गुन्हेगारी देखील वाढली आहे.
या भागातील गावांमधील शांतता प्रस्थापित करण्यासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंतर्गत महाळुंगे इंगळे या ठिकाणी नविन पोलीस ठाणे कार्यान्वित झाले आहे. एमआयडीसी टप्पा दोनमधील वासुली फाटा येथे मोठी बाजारपेठ अस्तिवात आल्याने अवैध धंदे, गुंडगिरी तसेच रोजीरोटीसाठी आलेल्या परप्रांतीयांना रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन धमकावून लुटमारी सारख्या घटना घडत असल्याने यावर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने वासुली फाटा येथे पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली होती.
वासुली फाटा येथे पोलीस चौकी सुरू करावी यासाठी लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले होते, याची दखल घेऊन पिंपरी चिंचवड आयुक्तलयाने महाळुंगे पोलीस ठाण्याच्या अंकित वासुली फाटा येथे पोलीस चौकी सुरू केली आहे.
वाढत्या औद्योगिक वसाहतीने वासुली फाटा येथे पोलीस चौकी सुरू झाल्याने अवैध धंदे, गुंडगिरी यावर बंधने येणार आहेत.
- मीरा कदम, सरपंच, सावरदरी.
एमआयडीसीच्या टप्पा दोनमध्ये नोकरीच्या निमित्ताने असंख्य परप्रांतीय नागरिक वास्तव्यास आहेत.रात्रीअपरात्री कामगारांच्या लुटमारीच्या घटना घडतात. पोलीस चौकी सुरू झाल्याने यावर अंकुश बसणार आहे.
- शीतल पिंजण, सरपंच भांबोली.
चाकण एमआयडीसीसह परिसरातील गावांमध्ये सामाजिक शांतता, सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी महाळूंगे पोलीस स्टेशन अंकित वासुली फाटा येथे नविन पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे.
- वसंत बाबर - वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महाळूंगे पोलीस ठाणे.