पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना दिलासा; तात्पुरत्या नवीन वीजजोडण्या देण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 12:03 PM2023-08-29T12:03:59+5:302023-08-29T12:04:13+5:30

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार

Relief to Public Boards in Pune; Instructions for providing temporary new power connections | पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना दिलासा; तात्पुरत्या नवीन वीजजोडण्या देण्याचे निर्देश

पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना दिलासा; तात्पुरत्या नवीन वीजजोडण्या देण्याचे निर्देश

googlenewsNext

पुणे : येत्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांना विनाविलंब तात्पुरत्या नवीन वीजजोडण्या आणि तत्पर वीजसेवा देण्यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवा. वीज सुरक्षेबाबत विशेष उपाययोजना करा, तसेच गणेश मंडळांना सुरक्षा ठेवीची (अनामत) रक्कम परत करण्याची कार्यवाही तातडीने करा, असे निर्देश मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. २८) पुणे परिमंडलातील पूर्वतयारीचा आढावा घेतल्यानंतर ते बाेलत हाेते. यावेळी अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, संजीव राठोड, तसेच कार्यकारी अभियंते उपस्थित होते.

हे आवश्यक

- पावसाची शक्यता असल्याने गणेश मंडळांनी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीजयंत्रणेची योग्य काळजी घ्यावी.
- मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था, संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घ्यावी.
- मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी.
- स्वीच बोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी.
- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे.
- मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सूलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तूंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सूलेशन टेपने जोड देण्यात यावा.

...तर अपघाताचा धाेका 

गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. काही कारणास्तव वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीजप्रवाह लघुदाब वीजवाहिनीत प्रवाहित होतो. त्यातून विद्युत अपघाताची शक्यता निर्माण होते. संततधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे मंडपातील वीजयंत्रणेसह सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या लाइटिंगचे वायर्स खाली झुकलेले नाही किंवा विस्कळीत झालेले नाहीत, याची दैनंदिन तपासणी करावी, असे आवाहन सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून करण्यात येत आहे.

नवीन वीजजोडणी देण्यात येणार 

गणेश मंडळांना तात्पुरती वीजजोडणी देण्याची कार्यवाही जलदगतीने झाली पाहिजे. ऑनलाइन अर्ज भरण्यासह इतर काही अडचणी येत असल्यास मंडळांना सहकार्य करावे. नवीन वीजजोडणी देण्यात येणार आहे, अशा सर्व रोहित्रांची व मिरवणुकांच्या मार्गावरील वीजयंत्रणेची पाहणी करावी. तसेच आवश्यकतेनुसार देखभाल दुरुस्ती करावी. गणेश मंडळांच्या सुरक्षा ठेवीची रक्कम त्यांना परत करण्याची कार्यवाही गणेशोत्सवानंतर एक ते दोन महिन्यांमध्ये पूर्ण करावी. - राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, महावितरण

Web Title: Relief to Public Boards in Pune; Instructions for providing temporary new power connections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.