भात पिकाला दिलासा! माळशेजच्या आदिवासी पट्ट्यात पावसाचे आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 03:55 PM2023-09-07T15:55:10+5:302023-09-07T16:00:43+5:30
भात पिकासह इतर रब्बी पिकांना दिलासा मिळणार असल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून, शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत....
उदापूर (पुणे) : जुन्नर तालुक्यासह माळशेज पट्ट्यातील आदिवासी भागात गेल्या अनेक दिवसांपासून वरुण राजाने हुलकावणी दिली होती. आदिवासी भागातील भात लागवड केलेली खचरे रिकामी होत चालली होती. त्यामुळे आदिवासी भागातील संपूर्ण वर्षाचे अर्थकारण सांभाळणारे मुख्य पीक धोक्यात आले होते. बळीराजा आपली पिके वाचवण्यासाठी पावसाची चातकासारखी वाट पाहत होता. अखेर गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याची प्रतीक्षा संपली आणि पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. त्यामुळे भात पिकासह इतर रब्बी पिकांना दिलासा मिळणार असल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून, शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
माळशेज पट्ट्यात पंधरा ते वीस दिवसांपासून उन्हाचा तीव्र चटका वाढत असल्यामुळे शेतातील रब्बी हंगामातील सोयाबीन, भुईमूग, तूर, उडीद, भात आदी पिके पाण्याअभावी सुकू लागली होती.
काही शेतकऱ्यांनी पिकांना स्प्रिंकलर करून पिके वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, परंतु तोही फेल ठरला. त्यामुळे पावसावाचून पर्याय नव्हता. हातातोंडाशी आलेली पिके पुन्हा एकदा वाया जाणार आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडणार अशी शक्यता निर्माण झाली होती.
गुरुवारी गोपाल काल्याच्या दिवशी सकाळीच पावसाने सुरुवात केली आणि शेतकऱ्यांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर बालचमूंचा गोपाल काला गोड झाला.