वाहतूक पाेलिसांना दिलासा ; प्रदूषणापासून हाेणार संरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 04:52 PM2019-05-09T16:52:44+5:302019-05-09T16:58:18+5:30
वाहतूक पाेलिसांना मास्क देण्यात येणार असून यामाध्यमातून प्रदूषणापासून त्यांचे रक्षण हाेऊ शकणार आहे.
पुणे : तासणतास प्रदूषणात उभे राहून वाहतूक नियमन पाेलिसांना करावे लागते. वाहनांमधून सातत्याने बाहेर पडणारा धून, प्रदूषण यांमुळे वाहतूक पाेलिसांना श्वसनाचे विकार हाेण्याची शक्यता असते. त्यातच वाहतूक विभागाने एका चाैकात सहा महिने फिक्स ड्युटीचा निर्णय घेतला असल्याने वाहतूक पाेलिसांना याचा अधिकच त्रास हाेणार आहे. त्यावर आता पुण्यातील वाहतूक पाेलिसांना मास्क देण्यात येणार असून यामाध्यमातून प्रदूषणापासून त्यांचे रक्षण हाेऊ शकणार आहे.
सध्या राज्यातील सर्वच शहरांमधील प्रदूषण कमालीचे वाढले आहे. हवेच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आयुर्मान देखील कमी हाेत चालले आहे. या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका हा वाहतूक पाेलिसांना बसत असताे. वाहतूक पाेलीस तासंतास चाैकामध्ये उभे राहून वाहतूक नियमन करत असतात. खासकरुन सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी वाहतूकीच्या संख्या अधिक असल्याने या वेळेत अधिक प्रदूषण हाेत असते. या प्रदूषणामुळे श्वसनाचे विविध विकार पाेलिसांना जडत असतात.
पुण्यातील स्वारगेट, नळस्टाॅप, येरवडा, शिवाजीनगर, विद्यापीठ चाैक या ठिकाणावरुन माेठी वाहतूक हाेत असते. एका चाैकात सलग सहा महिने ड्युटीचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला असल्याने या चाैकांमध्ये कामास असणाऱ्या पाेलिसांना प्रदूषणाचा अधिक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आता सर्वच वाहतूक पाेलिसांसाठी मास्क खरेदी करण्यात आले आहेत. येत्या दाेन दिवसांमध्ये याचे वाटप पाेलिसांना करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली.
मास्क खरेदी करण्यापूर्वी ससून रुग्णालयाच्या डाॅक्टरांचा सल्ला घेण्यात आला हाेता. त्यांच्या सल्ल्यानुसार चांगल्याप्रतिचे मास्क खरेदी करण्यात आले आहेत. यापूर्वी देखील गांधी टाेपी बराेबरच पाेलिसांना गाेल टाेपी पाेलिसांना देण्यात आली हाेती. या टाेपीमुळे वाढत्या उन्हापासून संरक्षणासाठी या टाेपीचा चांगला फायदा झाला हाेता.