‘सत्ता आणि पैसा’ यासाठी धर्म आणि समाजाचा वापर केला जातोय : प्रतिभा रानडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 05:46 PM2020-04-27T17:46:01+5:302020-04-27T17:48:39+5:30
सत्ता आणि पैसा याभोवती सध्या धर्म, राजकारण आणि समाजकारण केंद्रभूत
कथा, कादंबऱ्या ,कविता अशा चाकोरीबद्ध लेखन प्रवाहात न अडकता अनुबंध धर्म संस्कृतींचे : आर्थिक सत्ता आणि राजकारणाची धग , अफगाण डायरी : काल आणि आज, पाकिस्तान अस्मितेच्या शोधात , पाकिस्तान डायरी, फाळणी ते फाळणी अशा वेगळ्या धाटणीच्या लेखनामुळे साहित्य विश्वात प्रतिभा रानडे या लेखिकेचे नाव कायमच चर्चेत राहिले. आज वय वर्षे 83. पण विविध विषयांवरील चिंतनातून लेखन करण्याची उर्मी त्यांना अजूनही स्वस्थ बसू देत नाही. या प्रतिभावंत लेखिकेला यंदाचा अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा ''साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार'' जाहीर झाला आहे. त्यानिमित्त 'लोकमत' शी साधलेल्या संवादात सत्ता आणि पैसा यासाठी धर्म आणि समाजाचा वापर केला जातोय असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
------------------------------------------------------------------------------------------
नम्रता फडणीस
* धर्म, राजकारण, समाजकारण, फाळणी या चौकटीबाहेरील विषयांवर लेखन करण्याची प्रेरणा कशी मिळाली?
- कोणतीही कलाकृती ही स्वानुभवातूनच जन्म घेते. माझ्या बहुतांश लेखनाचे विषय हे आसपासचं जगणं, त्यातून आलेले अनुभव यामधूनच सुचत गेले आहेत. 1962मध्ये चीनने भारतावर हल्ला केला होता. तेव्हा आम्ही शिलॉंग मध्ये होतो.माझे पती भारतीय सेवेमध्ये आर्किटेक्ट होते. तिथे बॉम्बिंग सुरू झाले तेव्हा तिथल्या लष्कराने त्यांना हुसकावून लावले. म्हणून त्यांचा जीव वाचला. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी हिंदी चीनी भाई भाई असं म्हटल होतं. त्या चीनने भारतावर असा हल्ला करावा. तेव्हा लक्षात आलं की यामागं एकप्रकारचं राजकारण आणि सत्ताकारण आहे. मग पतीच्या बदलीमुळे दिल्ली, कलकत्ता, मणिपूर, शिलॉंग, अफगणिस्तान असा प्रवास सुरू झाला. या प्रवासादरम्यान आलेले अनुभव, सर्वसामान्यांची दु:ख लेखनातून मांडायला लागले. दिल्लीमध्ये असताना शहाबानो प्रकरणात तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांचीही आम्ही भेट घेतली होती. मात्र त्यांनी हतबलता दर्शवित कोणतीच पावले उचलली नाहीत. त्यावेळी मुस्लीम महिलांच्या तिहेरी तलाकच्या व्यथा लेखनातून मांडायचा प्रयत्न केला.
* साहित्य विश्वात स्त्रियांच्या लेखनाची म्हणावी तशी दखल घेतली जात नाही. अशी खंत अनेकदा लेखिकांकडून व्यक्त केली जाते. त्याविषयी काय वाटतं?
-बहुतांश स्त्रियांचे लेखन हे स्वत:ची दु:ख, वेदना, भावना या वर्तुळातच अडकलेले असते. मात्र आपल्या पलीकडे जाऊन जगात काय घडतयं, भोवतालचं राजकारण, महिलांना मंदिरातील प्रवेश नाकारणं, यांसारख्या विषयांवरही लिहायला हवं. आपल्या संवेदना आणि जाणीवा जागृत ठेवायला हव्यात. यातच एक बाजू अशीही आहे की जी माझ्या कानावर आली आहे, पण मला याचा काही वैयक्तिक अनुभव नाही. ती म्हणजे तुमचे कुणाशी लागेबंधे असल्याशिवाय तुम्हाला प्रसिद्धधी मिळत नाही. माझे कुणाशी लागेबंधे नाहीइचत. पण एकसांगावस वाटत की लेखिका व्हायचं असेल तर स्वत:च्या वर्तुळाबाहेर पडून लेखन करा, दखल निश्चितचं घेतली जाईल. आपण लिहित राहायला हवं.
* अनेक क्षेत्रात स्त्री-पुरूष समानता दिसते. मग साहित्य क्षेत्रात ती असल्याचं जाणवतं का? तुमचं निरीक्षण काय?
- मुळातच साहित्य क्षेत्रात लेखिकांची संख्याच कमी आहे. पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांच्या लेखनाचे प्रमाण अधिक नाही. त्यामुळे चित्र बदलायलाकाहीसा वेळ लागेल. पण आता स्त्रियांचे साहित्यामधील योगदान वाढतयं. ही एकआशादायक बाब म्हणता येईल.
* इतकी वर्षे साहित्य विश्वात विविधांगी लेखनामधून कार्यरत आहात. असे असतानाही संमेलनाध्यक्षपदासाठी तुमचा फारसा विचार झाला नाही. याची खंतजाणवते का?
-तसं मुळीच नाहीये. संमेलनाध्यक्षपदासाठी अनेकदा माझे नाव सुचविण्यात आले होते. मात्र मला संंमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीतले राजकारण पाहिल्यानंतरमीच अनेकवेळा नकार दिला. मला संंमेलनाध्यक्ष मुळीच व्हायचं नाही. यावर मी आजही ठाम आहे.
* जगभरातील धर्माचे राजकारण, सत्ताकारण, समाजकारण तुम्ही जवळून अनुभवलं आहे. देशातील हे चित्र कसं आहे असं वाटत?
- सत्ता आणि पैसा याभोवती सध्याच धर्म, राजकारण आणि समाजकारण केंद्रभूत आहे. या दोन्हीसाठी धर्म आणि समाज याचा वापर केला जातोय. भारतामधली स्थिती यापेक्षा वेगळी नाही.
* सध्या नवीन कोणते लेखन सुरू आहे का?
-दीड वर्षांपूर्वी एक बातमी होती की शास्त्रज्ञांनी जेनेटिक संशोधनामधून जुळ्या मुलींना जन्माला घातले. त्यांचा दावा होता की त्यांना कधीच एडस होणार नाही. यातून आजारांचं उच्चाटन होईल हे चांगलचं आहे. पण मनात आलंकी हे तंत्रज्ञान धर्मांध व्यक्तींच्या हातात गेले तर ते दहशतवादी निर्माण करू शकतील. सध्या रोबोट निर्माण केले जात आहेतचं. पूर्वी रामायण आणि महाभारतामध्ये हे होतचं होतं. मग तो देखील जेनेटिक तंत्रज्ञानाचाचप्रकार होता का? असा सगळा घोळ डोक्यात सुरू आहे. ते शोधत निघाले आहे.त्यावर कादंबरी लेखन करण्याचा विचार आहे.