'धर्म' हा जनजीवन विस्कळीत करण्यासाठी नाही: फादर फ्रान्सिस दिब्रिटो
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 07:16 PM2020-04-10T19:16:43+5:302020-04-10T19:17:03+5:30
सध्या कोरोनाच्या संकट काळात एकमेकांच्या धर्मावर आरोप- प्रत्यारोप करणे चुकीचे आहे.
नम्रता फडणीस-
पुणे : 'धर्म' हा माणसाचे अध्यात्मिक जीवन सुकर करण्यासाठी आहे.सध्या कोरोनाच्या संकट काळात एकमेकांच्या धर्मावर आरोप- प्रत्यारोप करणे चुकीचे आहे. 'धर्म' हा जनजीवन विस्कळीत करण्यासाठी नाही, असे परखड विचार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केले.
आजचा ( शुक्रवारी) चा ' गुड फ्रायडे' चा दिवस ख्रिश्चन धमीर्यांमध्ये अत्यन्त महत्वाचा मानला जातो. कारण याच दिवशी ख्रिश्चन धमार्चे प्रवर्तक प्रभू येशू यांनी प्राणाची आहुती दिली. हा दिवस शोक दिवस म्हणून पाळला जातो. त्यामुळे या दिवशी सर्व ख्रिश्चन धर्मिय बांधव चर्च मध्ये जाऊन येशू ख्रिस्त यांचे स्मरण करतात. या दिनाचे औचित्य साधत ' लोकमत' ने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याशी संवाद साधला.
ते म्हणाले, प्रभू येशू ख्रिस्ताने देखील जगाच्या उद्धारासाठी आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारला. जगाचं भल व्हावं ही त्यामागची इच्छा होती. शक्तीने प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांना बलिदान द्यावे लागले.. समाजाच्या हितासाठी बलिदानाला तयार व्हा असा संदेश प्रभू येशूने मानवजातीला दिला आहे. आजही या कोरोना लढ्यात शेकडो डॉकटर्स आणि नर्स एकप्रकारे बलिदानच देत आहेत. त्याकरिता प्रभूची कृपा आणि प्रेरणा आपल्या पाठीशी आहे. कोरोनाचे उद्भवलेले हे संकट जगव्यापी आहे. आपण सर्वजण कोरोनाशी लढा देताना जवळपास हतबल झालो आहोत. दु:ख आणि वेदना हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यातून मुक्त होऊ शकत नाही. तरी आपण प्रयत्न करीत आहोत. यातून आपण नक्की बाहेर पडू असा मला विश्वास आहे.
' धर्म हा माणसाचे अध्यात्मिक जीवन सुकर करण्यासाठी आहे. सध्याच्या संकट काळात एकमेकांच्या धर्मावर आरोप- प्रत्यारोप करणे चुकीचे आहे..सर्वात मोठा धर्म हा माणुसकीचा आहे. तो आपल्याला वाचवायचा आहे. यासाठी या काळात स्वत:वर बंधने घालून घेणे आवश्यक आहे.सध्या ख्रिस्त धमार्चा पवित्र महिना सुरू आहे. मात्र चर्च बंद असल्याने आम्ही आॅनलाईन प्रार्थना करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
.........................
' कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे घरातच लेखनकाम करत आहे. नोबेल पारितोषिक विजेत्यांची भाषणे ऐकत आहे. त्यातून खूप काही करण्याची स्फूर्ती मिळत आहे- फादर फ्रान्सिस दिब्रिटो, संमेलनाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन