Yogendra Yadav: भाजपने चालवलेल्या धर्मवाद, जातीवादाने देशाचे नुकसान; योगेंद्र यादवांची टीका
By राजू इनामदार | Published: November 10, 2024 07:19 PM2024-11-10T19:19:46+5:302024-11-10T19:20:06+5:30
देशाला वाचवणे कर्तव्य वाटल्याने आम्ही इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला
पुणे: राज्यघटनेला हात लावला तर कसा झटका बसतो याचा अनुभव लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने भारतीय जनता पक्षाला दिला, त्यामुळेच ते आता विधानसभा निवडणुकीत तो मुद्दा नाहीच असे म्हणत आहेत. मात्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही तोच मुद्दा आहे असा दावा भारत जोडो अभियान चळवळीचे केंद्रीय प्रमुख योगेंद्र यादव यांनी केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही त्यांना याचा फटका बसणार आहे असा दावा त्यांनी केला.
काँग्रेसभवनमध्ये यादव यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. चळवळीच्या राज्यप्रमुख उल्का महाजन, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यादव म्हणाले, “भारत जोडो हा देशातील सार्वजनिक चळवळीचा एक मंच आहे. आमचा राजकारणाशी काहीही संबध नाही, पण सन २०२२ पासून भाजपने देशात जो काही धर्मवाद, जातीवाद चालवला आहे, त्यात देशाचे नुकसान आहे. त्यापासून देशाला वाचवणे कर्तव्य वाटल्याने आम्ही इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. लोकसभेला देशातील १५५ लोकसभा मतदारसंघात, महाराष्ट्रात ३१ लोकसभा मतदारसंघात आम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांना भाजपकडून असलेले धोका समजावून दिला. त्यापैकी देशात ४० तर राज्यात १७ लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीला विजय मिळवला. हे आम्ही केले असे आमचे म्हणणे नाही, मात्र या विजयाचा आमचाही वाटा आहे.”
लोकसभेत फटका बसल्यानेच ते आता संविधानाचा मुद्दाच नाही असे म्हणत आहेत, मात्र विधानसभेला आम्ही १४० मतदारसंघापर्यंत पोहचलो आहोत, त्यामुळे राज्यघटना बदलाचा मुद्दा याही निवडणुकीत आहे असा दावा यादव यांनी केला. उल्का महाजन यांनीही यावेेळी ’भारत जोडो‘ ची भूमिका समजावून दिली. लोकसभेला मतांची कडकी झाली म्हणून आता यांना बहिण लाडकी झाली अशी टीका त्यांनी केली. आमच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला की भारत जोडो मध्ये नक्षलवादी लोक आहेत. ते गृहमंत्री आहेत, त्यांनी त्यांचा हा आरोप सिद्ध करून दाखवावा असे आव्हान महाजन यांनी दिले.
हरियाना विधानसभेत काँग्रेसचा विजय होणार अशी कोणतीही भविष्यवाणी मी केलेली नव्हती. त्याबाबत अपूरी माहिती प्रसिद्ध झाली. मी कोणी भविष्यवेत्ता नाही, पूर्वी होतो पण ते काम मी आता करत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात काय होईल, झारखंडमध्ये काय होईल हे मी सांगू शकत नाही. आमच्या चळवळीचा चांगला उपयोग होतो आहे हे मात्र मी सांगू शकतो- योगेंद्र यादव, केंद्रीय प्रमुख भारत जोडो अभियान