चांडोली येथे आषाढी एकादशीनिमित्त धार्मिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:09 AM2021-07-21T04:09:58+5:302021-07-21T04:09:58+5:30
आषाढी एकादशी निमित्त खेड तालुक्यातील चांडोली,शिरोली या परिसरातील भाविक भक्त,कीर्तनकार,वारकरी व नागरिकांनी चांडोली येथील भीमानदीच्या काठावर वसलेल्या अतिप्राचीन ऐतिहासिक ...
आषाढी एकादशी निमित्त खेड तालुक्यातील चांडोली,शिरोली या परिसरातील भाविक भक्त,कीर्तनकार,वारकरी व नागरिकांनी चांडोली येथील भीमानदीच्या काठावर वसलेल्या अतिप्राचीन ऐतिहासिक व धार्मिक महत्व प्राप्त असलेल्या अशा डूबीतील विठ्ठल मंदिरात पांडुरंगाचे दर्शन घेत एकादशी साजरी केली.
एकादशी निमित्त मंगळवार (दि.२०) रोजी सकाळी डूबीतील विठ्ठल मंदिरात विठ्ठल रुख्मिणी मंदिर ट्रस्टच्या वतीने नामदेव वाघमारे, सोपान वाघमारे, शंकर सावंत, विठ्ठल सावंत, रामभाऊ सावंत, पांडुरंग वाघमारे, शिवाजी सावंत, हरिभाऊ सावंत यांनी विठ्ठल रुख्मिणीच्या मूर्तींची पूजा केली. दिवसभर खेड तालुक्याच्या विविध भागातून वारकरी व कीर्तनकार यांनी येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली होती. चांडोली व शिरोली येथील नागरिकांनीही येथे कोरोनाचे सर्व नियम पाळून पांडुरंगाचे दर्शन घेतले. यावेळी ट्रस्टच्या वतीने येणाऱ्या भाविकांना फराळ व उपवासाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले.
--
देव डुबीत वास करण्याची अख्यायिका
कडूस (ता.खेड) येथील पांडुरंग उत्सवाच्यावेळी भगवान पांडुरंग स्वतः पंढरपूर येथून कडूस येथे येताना अगोदरच्या दिवशी एक दिवस चांडोली येथील डूबीतील या ठिकाणी एक दिवस थांबतात पांडुरंगाचे हे महात्म्य जाणून क्रांतिवीर हुतात्मा राजगुरू यांचे ७ वे पूर्वज कचेश्वर स्वामी यांनी शाहू महाराजांच्या काळात स्वहस्ते येथील पांडुरंग व रुख्मिणीमाईच्या मूर्ती बसविलेल्या आहेत, अशी अख्यायिका असल्याची माहिती येथील ट्रस्टचे प्रमुख नामदेव वाघमारे यांनी दिली.
---