परदेशात छत्रपतींच्या आठवणींना उजाळा; दुबईत मुलांनी साकारली प्रतापगडाची प्रतिकृती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 07:40 PM2023-11-20T19:40:22+5:302023-11-20T19:40:53+5:30
यंदाचे वर्ष हे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष म्हणून ओळखले जात असून या कार्यक्रमाला जमलेल्या सर्व प्रेक्षकांनी ३५० दिवे लावून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.
भानुदास पऱ्हाड
आळंदी : दिवाळीचा सण म्हणजे फराळ, फटाके, आकाश कंदील व आप्तजनांच्या भेटीगाठी त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला (दुर्ग) बनवण्याची एक प्रथा आहे. आजकालच्या काळात ही प्रथा लुप्त होताना दिसत आहे. मात्र सातासमुद्रापार दुबईत स्थित असलेल्या प्रथा संस्थेने एक क्रांतिकारी उपक्रम राबवत प्रतापगडाची प्रतिकृती साकारून छत्रपतींच्या आठवणींना उजाळा दिला.
दुबईतील ममझार पार्कमध्ये प्रथा या संस्थेने 'प्रथा दुर्ग मोहीम' वर्कशॉप केला. दुबईत स्थायिक झालेल्या महाराष्ट्रीय कुटुंबियांच्या मुलांना एकत्रित आणून वर्कशॉपच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व त्यांच्या गडकिल्ल्यांविषयी माहिती बालमित्रांना दिली. यंदाचे हे प्रथा दुर्ग मोहीमचे पहिलेच वर्ष असून प्रथा संस्थेने प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती बनवण्याचे ठरवले. सॉलिटेअर इव्हेंट्स या कंपनीने या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी सांभाळली.
यंदाचे वर्ष हे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष म्हणून ओळखले जात असून या कार्यक्रमाला जमलेल्या सर्व प्रेक्षकांनी ३५० दिवे लावून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. या कार्यक्रमाला मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी भेट देत उपक्रमाचे तसेच लहान मुलांचे भरभरुन कौतुक केले व त्यांना प्रोत्साहन दिले. प्रथा संस्थेचे संस्थापक सागर पाटील व त्रिविक्रम ढोल ताशा पथकातल्या सवंगड्यांना घेऊन त्यांनी ही आगळीवेगळी दुर्ग मोहीम राबवली. एक दिवस रंगलेल्या ह्या वर्कशॉप ची सुरुवात भूमिपूजनाने झाली. त्यानंतर किल्ल्याची आखणी व किल्याचे बांधकाम याचे प्रशिक्षण लहान मुलांना देण्यात आले. मातीचे मिश्रण करून त्याचा लेप किल्ल्याला लावण्यात आला. हुबेहूब प्रतापगडाची प्रतिकृती साकारण्यात आली. दुबईमध्ये लहान मुलांसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात आला. त्यामुळे प्रथा या संस्थेचे कौतुक पालकांनी भरभरून केले.
पाच मीटर लांबी व तीन मीटर रुंदी असलेली ही प्रतापगडची प्रतिकृती बनवायला साधारण आठ तास लागले. सुमारे ५० गोणी दगड व एक टन माती वापरण्यात आली असे प्रथा संस्थेचे संचालक सागर पाटील यांनी सांगितले. या मोहिमेमध्ये ३० लहान मुलांनी सहभाग घेतला. संपूर्ण आखाती देशातील पहिले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्रिविक्रम ढोल ताशा पथकाच्या तरुण वादकांनी यात स्वयंसेवक म्हणून दुर्ग बांधायला व लहान मुलांना ही प्रथा शिकवायला हाथभार लावला.