तेल कंपन्यांचे टर्मिनल स्थलांतरित करा : अशोक पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:08 AM2021-06-28T04:08:26+5:302021-06-28T04:08:26+5:30
हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती व लोणी काळभोर या दोन्ही ग्रामपंचायत हद्दीत सुमारे एक लाखापेक्षा अधिक नागरिक राहतात. व दिवसेंदिवस येथील ...
हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती व लोणी काळभोर या दोन्ही ग्रामपंचायत हद्दीत सुमारे एक लाखापेक्षा अधिक नागरिक राहतात. व दिवसेंदिवस येथील नागरिकीकरण वाढत आहे. या तीनही तेल कंपनीच्या टाक्या पुणे - सोलापूर महामार्गालगत आहेत. उरवडे प्रमाणे एखादी दुर्घटना घडली तर या दोन्ही मोठ्या ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
यामुळे या कंपन्याने डेपो लोकवस्ती नसलेल्या शासनाच्या मालकीच्या जागेत स्थलांतरित करण्याची मागणी आमदार अशोक पवार यांनी एका पत्राद्वारे राज्य शासन, पुणे महानगर प्रदेश विकास (पीएमआरडीए) यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देतांना आमदार अशोक पवार म्हणाले की गेल्या आठवड्यात पिंरगुट जवळच्या उरवडे येथील एका केमिकल कंपनीला आग लागल्याने अनेक नागरिक प्राणास मुकले होते. या पध्दतीच एखादी घटना वरील तीन कंपन्याच्या डेपोत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे घडले तर भविष्यात लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या ग्रामपंचायत हद्दीतील लाखो नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हा भविष्यातील धोका लक्षात घेऊन शासनाने या तीनही कंपन्यांचे डेपो लोकवस्ती नाही अश्या शासकीय जागेत स्थलांतरीत कराव्यात. नागपुर येथील तेल कंपण्यांचे डेपो लोकवस्ती नसलेल्या गायराण व शासकीय भागात हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याच धर्तीवर वरील कंपन्यांचे डेपो स्थलांतरित करण्याबाबत शासनाने विचार करावा.
या तीन्ही टर्मिनलने मोठी जागा व्यापली असून ती स्थलांतरित केल्यास रिक्त होणारी जागा शासनाने पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या ताब्यात द्यावी. सदर जागेवर पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरणाने (पीएमआरडीए) शासकीय कार्यालये, शासकीय हॉस्पिटल, कमर्शियल बिल्डिंग, असे विविध प्रकारचे चांगले व लोकहिताचे प्रकल्प उभा करण्याचा विचार करावा.