रेमडेसिवीर, ऑक्सिजन अभावी रुग्णांची तडफड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:11 AM2021-04-20T04:11:26+5:302021-04-20T04:11:26+5:30
जिल्हात पुणे शहरानंतर पूर्व हवेली तालुक्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण वाढीचा दर आहे. कोरोनाचे रुग्ण वाढण्यासहीत मृत्यूचा दरही चिंताजनक ठरु ...
जिल्हात पुणे शहरानंतर पूर्व हवेली तालुक्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण वाढीचा दर आहे. कोरोनाचे रुग्ण वाढण्यासहीत मृत्यूचा दरही चिंताजनक ठरु लागला आहे. कोरोना बाधितांना बेड न मिळणे, ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेडची सुविधा अतिशय नगण्य असल्याने कोरोनावर उपचाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच तालुक्यात कोरोनावर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे.
अशा स्थितीत खासगी रुग्णालयांची नोंदणी जिल्हा प्रशासनाकडे करूनही आणि रेमडेसिविर कोटा जिल्हा प्रशासनाकडे मागूनही तीन -चार दिवस उलटून गेले तरी रेमडेसिविरचा पुरवठा झाला नाही. जिल्हाधिकारी यांनी टास्क फोर्स व अन्न - औषध प्रशासन विभागाला संयुक्तरीत्या नियोजन देऊन हा पुरवठा सुरू आहे असे सांगितले मात्र प्रत्यक्षात पूर्व हवेली तालुक्यात पुरवठा होत नाही. जिल्हा प्रशासनाने रेमडेसिविर पुरवठा सुरळीत न केल्यास खाजगी रुग्णालयांनी रुग्णांना उपचारास दाखल करुन घेणार नाही असा इशारा दिला आहे. त्याबाबत अन्न - औषध विभागाच्या निरीक्षक सुचित्रा जाधव यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
जिल्हाधिकाऱ्यांनी कडक पावले उचलून आणि जातीने लक्ष घालून पूर्व हवेलीत रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी उरुळी कांचनचे सरपंच संतोष हरिभाऊ कांचन, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष आबासाहेब कांचन, माजी सरपंच दत्तात्रय कांचन, माजी उपसरपंच भाऊसाहेब तुपे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य अजिंक्य कांचन यांनी केली आहे.
--