रेमडेसिविरचा काळा बाजार रोखण्यासाठी वितरणपद्धत जाहिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:14 AM2021-04-30T04:14:38+5:302021-04-30T04:14:38+5:30
पुणे : जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीमुळे इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. दरम्यान काहींनी ...
पुणे : जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीमुळे इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. दरम्यान काहींनी रेमडेसिविरचा साठेबाजी करून काळा बाजार सुरू केला होता. यामुळे या वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी नेमण्यात आला आहे. यात आणखी पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी इंजेक्शनच्या वितरणाची पद्धत जाहीर केली आहे.
जिल्ह्याला मुख्य उत्पादकाकडून वितरकांना इंजेक्शन्स प्राप्त होतात. या बाबतची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे स्थानिक अधिकारी यांना दिली जाते. त्यानंतर जिल्ह्यातील डेडीकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, डीसीएच रुग्णालयांमध्ये असणारे आसीयू आणि ऑक्सीजन खाटा, व्हेंटीलेटर्सची माहिती, रूग्णालयानिहाय मुख्य आरोग्य अधिकारी, मनपा, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य अदिकारी यांच्याकडून मागविली जाते. त्या द्वारे त्यांची गरज ओळखून समप्रमाणात इंजेक्शनचे वाटप केले जाते. पहिल्या आदेशातील रुग्णालये ही दुसऱ्या आदेशामध्ये वगळली जातात. यामध्ये विसंगती होणार नाही याच तसेच वाटपाचे प्रमाण समान राहील याची दक्षता यंत्रेणेमार्फत घेतली जाते. वर्गीकरण केलेल्या यादीमधील रुग्णलयाच्या समोर रेमसेसिविर इंजेक्शन देणारे वितरक/ कंपनीे नाव अन्न व औषध प्रशासनामार्फत निश्चित करण्यात येते. ही यादी प्रसिद्ध करून ती जिल्हाधिकारी कार्यलयाच्या कोरोना अपडेट या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येते. ज्यात रूग्णालयाचे नाव रूग्णालयाचा पत्ता, खाटांची संख्या, आणि वितरित केेलेल्या इंजेक्शनच्या साठ्याची माहिती दिली जाते. तसेच सर्व रुग्णालये आणि सर्व वितरकांची नावे आणि इमेल व्हॉटस्पच्या माध्यमातूनसुद्धा पुरविली जातात.
रूग्णालय स्तरावर वितरक अथवा स्टॅाकिस्ट यांच्याकडून वाटप आदेशानुसार रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी केले जाते. यासाठी रुग्णालयामार्फत औषधसाठा प्राप्त करुन घेण्यासाठी रुग्णालयाच्या लेटर हेडवर प्राधिकार पत्र सही शिक्यानिशी व प्राधिकृत व्यक्तीचे छायाचित्र आणि ओळखपत्र घाऊक विक्रत्याकडे सादर करणे आवश्यक आहे. या बाबतची खातरजमा करुन घाऊक विक्रेत्यांनी रेमडेसिविरचे योग्य वितरण घाउक विक्री दरानेच करणे गरजेचे आहे.
इंजेक्शन रुग्णास देण्यापूर्वी अॅनेक्शर बी या नमुन्यात असलेल्या प्रिस्क्रीप्शन रुग्णलयाने देणे बंधनकारक आहे. तसेच हे प्रिस्क्रीप्शन विचारात घेऊन प्राप्त इंजेंक्शन्स प्राधान्याने गरजू रुग्णांना द्यावे लागणार आहे. या बाबतची नोंदवही ठेवणे बंधनकारक आहे.
चौकट
काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथकाची स्थापना
जिल्ह्यात रेमडेसिविरचा काळा बाजार रोखण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. या पथकाद्वारे इंजेक्शन वाटपासंदर्भात ठेवलेल्या अभिलेखांची तसेच साठ्याची तपासणी हे भरारी पथक करणार आहे. तपासणीमध्ये गंभीर दोष आठळल्यास अन्न व औषध प्रशासनामार्फत कठोर कारवाई संबंधितांवर केली जाणार आहे. या इंजेक्शनच्या वितरणासंदर्भात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून ०२०-२६१२३३७१ या क्रमांकावर तर १०७७ टोल फ्री कमांकावर संपर्क साधता येणार आहे.