रेमडेसिविरची गरज २० हजार, साठा केवळ सहा हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:11 AM2021-04-13T04:11:33+5:302021-04-13T04:11:33+5:30
पुणे : पुणे शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने पुरवठ्यावर नियंत्रणासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. मात्र, गरज ...
पुणे : पुणे शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने पुरवठ्यावर नियंत्रणासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. मात्र, गरज २० हजार इंजेक्शनची आणि केवळ सहा हजारच इंजेक्शन उपलब्ध असल्याने नातेवाइकांची वणवण सुरूच आहे.
पुण्यामध्ये सरकारी आणि खासगी मिळून सर्व हॉस्पिटलने २० हजार इंजेक्शनची मागणी केली आहे. मात्र, टास्क फोर्सच्या म्हणण्यानुसार केवळ १५ ते २० टक्के रुग्णांनाच इंजेक्शनची खरी गरज आहे. त्यामुळे टास्क फोर्सने सांगितल्यानुसार रुग्णालयात दाखल झालेल्या एकूण पेशंटच्या केवळ सरासरी १५-२० टक्के रुग्णांनाच रेमडेसिविरची गरज असते. त्यानुसार सध्या पुरवठा होत आहे. महापालिकेच्या रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांना देखील सोमवारी रेमडेसिविरचा पुरवठा करण्यात आला.
जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसापूर्वी आदेश काढून मेडिकलमधील रेमडेसिविरची विक्री बंद केली. तसेच यापुढे केवळ रुग्णालयांमध्येच थेट रेमडेसिविरचे वितरण करण्यात येते. परंतु गेल्या दोन दिवसांत पेशंटला ना मेडिकल ना रुग्णालयात रेमडेसिविर उपलब्ध झाले नाही यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये खूप अस्वस्थता आहे, असे नातेवाईक म्हणत आहेत. तरीही सोमवारी दुपारपासून सहा हजार रेमडेसिविरचे वितरण सुरू झाल्याने परिस्थिती काही प्रमाणात निवळली आहे.