आंबेगाव तालुक्यात बिबट्या आणि बछड्याचे घडले पुनर्मिलन..
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 07:48 PM2019-03-06T19:48:03+5:302019-03-06T19:50:45+5:30
आई आणि मुलाच्या नाते जगातलं सर्वात सुंदर आणि परिपूर्ण असे नाते समजले जाते. कारण...
आंबेगाव : आई आणि मुलाच्या नाते जगातलं सर्वात सुंदर आणि परिपूर्ण असे नाते समजले जाते. कारण या नात्यांमध्ये वात्सल्य, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या सगळ्या भावनांचा अप्रतिम मिलाफ बघायला मिळतो. मग या नात्याला मानव आणि प्राणी अशा चौकटींचं बंधनसुध्दा कुठे उरते. तसाच काहीसा प्रसंग आंबेगाव तालुक्यात पाहायला मिळाले. नाते फक्त माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही तेवढेच जिव्हाळ्याचे असल्याचे दिसून येते. पुणे जिल्ह्यातील नागापूर (ता.आंबेगाव) गावामध्ये बिबट्याच्या बछड्याचं आईशी मिलाफ घडवण्यात यश आले.
उसाच्या शेतात दोन महिन्यांचं बिबट्याचे पिल्लू गावकऱ्यांना सापडले होते. गावकऱ्यांनी या अनाथ बछड्याला वनविभागाकडे आणून दिले. वनविभाग मंचर आणि माणिकडोह बिबट निवारा टीम यांनी हे पिल्लू काल रात्री जिथे सापडले तिथेच ठेवले. या लहान पिल्लाचा शोध मादी बिबट्या घेत असेल अशी खात्री वनविभागाला होती. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ही पिल्ले त्याच शेतात ठेवली होती.त्यानंतर मादी बिबट्या आली आणि बछड्याला घेऊन गेली.
पिल्ले घेऊन जातानाचा तिचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे. मुक्या प्राण्यांमधील आईचे वात्सल्य कसे असते हेच या व्हिडिओत पाहायला मिळाले.