पत्रकारांना माहिती दिल्यास याद राखा

By Admin | Published: April 10, 2015 05:41 AM2015-04-10T05:41:26+5:302015-04-10T05:41:26+5:30

ठेकेदारांशी असलेले आपल्या पक्षाच्या नगरसेवकांचे साटेलोटे आणि चिरीमिरीची प्रकरणे बाहेर येऊ नयेत, म्हणून धास्तावलेल्या महापालिकेतील

Remember to give information to the reporters | पत्रकारांना माहिती दिल्यास याद राखा

पत्रकारांना माहिती दिल्यास याद राखा

googlenewsNext

पुणे : ठेकेदारांशी असलेले आपल्या पक्षाच्या नगरसेवकांचे साटेलोटे आणि चिरीमिरीची प्रकरणे बाहेर येऊ नयेत, म्हणून धास्तावलेल्या महापालिकेतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना पत्रकारांना माहिती देण्यास मज्जाव केला आहे. विशेष म्हणजे याबाबतचे आदेश या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना दिले असून, यापुढे कोणत्याही विभागप्रमुखाने पत्रकारांना माहिती देऊ नये, म्हणून आचारसंहिता लागू करण्याचे आदेश गुरुवारी दिले आहेत. तसेच यापुढे माहिती दिल्यास याद राखा, असा सज्जड दमही गेल्या काही दिवसांत पालिकेच्या अधिकाऱ्यांना भरला आहे.
काही दिवसांपासून पालिकेतील अनेक गैरव्यवहारांची प्रकरणे समोर येत आहेत. त्याचा धसका राष्ट्रवादीने घेतला आहे. विशेषत: स्थायी समितीमधील सुरू असलेल्या गोंधळाच्या बातम्या गेल्या महिनाभरापासून बाहेर येत आहेत. त्यामुळे पत्रकारांना उत्तरे देताना, या पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे पत्रकारांना थेट मज्जाव घालता येत नसल्याने महापालिकेच्या विभागांमध्ये सुरू असलेल्या कामकाजांची तसेच नगरसेवकांच्या प्रकरणांची माहिती बाहेर येऊ नये, या उद्देशाने गुरुवारी महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम आणि सभागृह नेत्यांनी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्यासह सर्व विभागप्रमुखांची बैठक बोलाविली होती.
या बैठकीची कोणतीही पूर्वकल्पना न देता, ती सुरू होताच तुम्ही पत्रकारांना परस्पर माहिती कशी देता, अशी विचारणा करीत काही अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. तसेच यापुढे कोणतीही माहिती द्यायची असेल तर आम्हाला विचारल्याशिवाय द्यायची नाही, अशा शब्दांत आयुक्तांनाही सुनावण्यात आले. असे बंधन घालता येणार नसल्याचे आयुक्तांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांना आचारसंहिता आखून द्या, असा आदेश देण्यात आला.

Web Title: Remember to give information to the reporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.