चांगले कर्म करताना गुरुजनांची आठवण ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:10 AM2021-03-10T04:10:52+5:302021-03-10T04:10:52+5:30
डॉ. मच्छिंद्र कडोले यांचे मत : पु.ग.वैद्य पुरस्कार वितरण सोहळा लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कलाकाराकडे त्याची ...
डॉ. मच्छिंद्र कडोले यांचे मत : पु.ग.वैद्य पुरस्कार वितरण सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कलाकाराकडे त्याची कला दाखवण्यासाठी वेगवेगळी माध्यमे असतात. शिक्षक हा इतरांपेक्षा महान कलाकार आहे. त्यांच्या कलेतूनच अनेक यशस्वी व्यक्तिमत्व घडतात. शिक्षक विद्यार्थ्यांना घडविताना आपले सर्वस्व पणाला लावतात. म्हणून जीवनात चांगले कर्म करताना गुरूजनांची आठवण ठेवा, असे मत केंद्रीय तपास यंत्रणेचे पोलीस अधीक्षक डॉ. मच्छिंद्र कडोले यांनी व्यक्त केले.
डेक्कन येथील विद्या महामंडळ संस्थेच्या लक्ष्मणराव आपटे प्रशालेच्या वतीने पु. ग. वैद्य स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी विद्या महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अभय आपटे, कार्यवाह गीता देडगावकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख, मुख्याध्यापिका मेधा सिन्नरकर आदी उपस्थित होते. या वेळी शाळेचे माजी विद्यार्थी असलेले केंद्रीय तपास यंत्रणेचे पोलीस अधीक्षक डॉ. मच्छिंद्र कडोले यांना पु. ग. वैद्य या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, ११ हजार रोख रक्कम आदी पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराची रक्कम त्यांनी संस्थेला देणगी स्वरूपात दिली. अमोल हरभरे यांनी सूत्रसंचालन केले. गीता देडगावकर यांनी प्रास्ताविक केले. मेधा सिन्नरकर यांनी आभार मानले.