३८ वर्षांनंतर दिला आठवणींना उजाळा
By admin | Published: July 8, 2017 01:51 AM2017-07-08T01:51:25+5:302017-07-08T01:51:25+5:30
वयाच्या ६व्या वर्षी वडिलांचे छत्र हरवले. त्यानंतर माझा सांभाळ आईने केला तसेच माझी जडणघडण शाळेतील शिक्षकांमुळे झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पौड : वयाच्या ६व्या वर्षी वडिलांचे छत्र हरवले. त्यानंतर माझा सांभाळ आईने केला तसेच माझी जडणघडण शाळेतील शिक्षकांमुळे झाली. शाळेमुळेच मी घडलो, असे मत प्रसिद्ध उद्योजक विलास चोरगे यांनी तब्बल ३८ वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात व्यक्त केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे पिरंगुट इंग्लिश स्कूल या शाळेच्या १९७८-७९ मधील १०वीच्या तुकडीचे विद्यार्थी तब्बल ३८ वर्षांनंतर एकत्र आले. तत्कालीन शिक्षक, वर्गमित्र व शाळेच्या आठवणींना या माजी विद्यार्थ्यांनी उजाळा दिला. विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळविलेल्या शाळेच्या १९७८-७९मधील १०वीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गुरू पौर्णिमेच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून माजी विद्यार्थी मेळावा व गुरुजन सत्कार समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाचे सचिव अनिल गुंजाळ हे प्रमुख अतिथी तसेच खजिनदार मोहनराव देशमुख उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून हेमंत पांडे, प्रसिद्ध उद्योजक विलास चोरगे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
हेमंत पांडे यांनी शिक्षकांना देण्यात आलेल्या सन्मानचिन्हांच्या मानपत्राचे वाचन केले. माजी शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या ज्येष्ठ व वयोवृद्ध शिक्षकांनी आपल्या मनोगतातून मागील ३८ वर्षांपूर्वीच्या भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला. तत्कालीन मुख्याध्यापक निकम, सहशिक्षक शाबुद्दिन, वाळुंज, गुंजाळ, वडेर, नागरे, जाधव, चव्हाण या शिक्षकांनी अनेक आठवणी उजाळा दिला. शहाबुद्दीन यांनी माजी विद्यार्थ्यांनी सध्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचे आवाहन केले. या तुकडीला शिकविणारे तत्कालीन शिक्षक व या तुकडीतील विद्यार्थी मागील काही वर्षांत काळाच्या पडद्याआड गेले त्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या तत्कालीन शिक्षकांचा सत्कार केला. तसेच शाळेत या वर्षी १० वी व १२ वीच्या बोर्ड परीक्षेत शाळेतून प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचाही रोख पारितोषिके देऊन माजी विद्यार्थ्यांनी सन्मानित केले.
स्नेह मेळावा यशस्वी होण्यासाठी विलास चोरगे, हेमंत पांडे, एम. ए. जाधव, बाळासाहेब गोळे, अशोक कोरडे, अविनाश धनलोभे आदींनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप कदम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कार्याची माहिती दिली. तसेच, माजी विद्यार्थ्यांनी ३८ वर्षांनंतर आपली संस्था, शाळा व शिक्षकांची आठवण ठेवून हा मेळावा घेतल्याबद्दल अभिनंदन केले. संतोष गावडे यांनी सूत्रसंचालन केले.